निविष्ठा विक्रेते, रासायनिक खते, बी- बियाणे उत्पादक कंपनीचे प्रतिनिधी व कृषि विभागाचे अधिकारी यांची जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा सभा संपन्न झाली. येत्या एक जून पासून खरीप हंगामास सुरूवात होत असून, पुढील 10 ते 15 दिवसात शेतीच्या मशागतीच्या कामांना वेग येईल. त्याबरोबरच शेतीला लागणारी बियाणे, रासायनिक खते, किटकनाशके व कृषि औजारे यांची खरेदी करण्यासाठी शेतकऱ्यांची कृषि सेवा केंद्राकडे झुंबड उठेल या गोष्टी लक्षात घेऊन त्याचे नियोजन करण्यासाठी जिज्हयातील कृषि सेवा केंद्रांचे चालक, प्रतिनिधी, खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी आणि कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांची जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा सभा दि. 25 एप्रिल 2023 रोजी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रूपाली सातपुते यांचे प्रमुख उपस्थितीत व जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. दिपक कुटे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या सभेत खते, बियाणे, किटकनाशके याचे नियोजन, वाहतूक, संरक्षित साठा, विक्री व गोदामांची व्यवस्था या विषयावर विस्तृत चर्चा झाली. विभागीय गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री. अजिंक्य पवार यांनी खत नियंत्रण आदेश – 1955, बियाणे नियंत्रण आदेश- 1983 व किटकनाशके कायदा – 1968 या मधील तरतुदी बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले.
त्याचप्रमाणे खते, बियाणे, किटकनाशके परवाने, त्यांचे नुतनीकरण व विक्री करताना कायद्याचे पालन करूनच विक्री करावी अन्यथा नाइलाजाने कायदेशीर कारवाई करावी लागेल असा सक्त इशारा जिल्हा परिषदेचे मोहिम अधिकारी श्री. तात्यासाहेब कोळेकर यांनी निविष्ठा विक्रेत्यांना दिला.
खरीप हंगामातील बियाणे नियोजन, पुरवठा, विक्री तसेच बियाण्यांच्या संभाव्य तक्रारी बाबत करावयाच्या उपाययोजना याबाबत कृषि अधिकारी श्री. बी.डी. जावीर यांनी विस्तृतपणे सांगितले.
रासायनिक खतांची विक्री करताना POS मशीन द्वारेच करण्यात यावी. तसेच विना POS मशिन खत विक्री केल्यास खत विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात येतील अशा कडक शब्दांत जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी श्री. दिपक कुटे यांनी संबधितांना निक्षून सांगितले. त्याचप्रमाणे खते खरेदी- विक्रीचे अभिलेख अद्यावत ठेवावेत अशा सूचना देण्यात आल्या.
जिल्हा परिषदेच्या अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.रूपाली सातपुते यांनी खते, बियाण्यांचे नियोजन काटेकोरपणे करावे तसेच ऐन हंगामात कुठेही टंचाई जाणवणार नाही याची दक्षता कृषि अधिकारी, उत्पादक कंपन्या व विक्रेते यांनी घ्याव्यात अशा सूचना सर्व संबधितांना दिल्या.
खते, बियाणे उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, विक्रेते यांच्या अडचणी समजावून घेतल्या व त्याचे समाधान करण्यात आले. जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक श्री. भगवान पथारे यांनी सर्व उपस्थित अधिकारी, कर्मचारी, खत उत्पादक कंपन्यांचे प्रतिनिधी, निविष्ठा विक्रेते यांचे आभार मानून सभा संपन्न झाल्याचे घोषित केले.