ठाणे जिल्ह्यात खरीप हंगामाच्या कामांची लगबग सुरु झाली असून त्यासाठी लागणारे रासायनिक खते, बी-बियाणे व किटकनाशके या निविष्ठा शेती व शेतकरी यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या आहेत. जिल्ह्यात भात पिकाखालील सरासरी क्षेत्र 55,000 हेक्टर एवढे आहे. तसेच एकूण खरीपाखालील क्षेत्र सर्वसाधारणपणे 65,000 हेक्टर एवढे आहे.
जिल्ह्यासाठी भात बियाण्यांची गरज 22,000 क्विंटल एवढी असून 55% बियाणे बदल अपेक्षित धरुन शासनाकडे 12,100 क्विंटल भात बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. त्यामध्ये सुधारित व संकरित वाणांचा समावेश आहे.
भात बियाण्यांचा पुरवठा प्रामुख्याने महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ व विविध खाजगी बियाणे उत्पादक कंपन्यांमार्फत होतो. त्याचप्रमाणे 11,390 मे.टन रासायनिक खतांची शासनाकडे मागणी करण्यात आली असून जिल्ह्यासाठी 10,520 मे.टन खतांचा साठा मंजूर झाला आहे. आज अखेर जिल्ह्यात 2000 मे.टन खते उपलब्ध आहेत. खतांची टंचाई जाणवणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे 20 ते 25 हजार लिटर विविध किटकनाशके व बुरशीनाशकांची मागणी करण्यात आली आहे. खरीप हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी शासनाचा कृषि विभाग, जिल्हा परिषदेचा कृषि विभाग, विविध यंत्रणा समन्वयाने काम करणार आहेत.
“रासायनिक खते, बी-बियाणे व किटकनाशके यांचा काळाबाजार, साठेबाजी यांना आळा घालण्यासाठी व कृषि केंद्रांवर देखरेख ठेवण्यासाठी 6 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. खरीप हंगामासाठी सर्व शेतकरी बांधवांना माझ्याकडून शुभेच्छा” – डॉ. रुपाली सातपुते, अति.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे
°°°°