“शाबासकीची कौतुकाची थाप दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळावी”- अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते
ठाणे:समाज कल्याण विभाग, जिल्हा परिषद,ठाणे मार्फत ५% दिव्यांग कल्याण सेस फंडातून सन २०२३-२४ या वर्षामध्ये राबविण्यास घेण्यात आलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तूंची विक्री करण्याकरीता मध्यवर्ती विक्री केंद्राची स्थापना जिल्हा परिषदेच्या आवारात करण्यात आले होते. आज सांगता कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. दिव्यांग विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाळेमध्ये बनविलेल्या गृहपयोगी व शोभेच्या वस्तूंसाठीचा विक्री मेळाव्यास नागरिकांनी भरघोस प्रतिसाद दिला.

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनुज जिंदल यांनी सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित केले. तसेच १९ विक्री केंद्रांवर भेट देऊन दिव्यांग विद्यार्थ्यांचे विशेष कौतुक केले. पुढील वर्षी देखील असे उपक्रम राबविण्यात येतील अशी माहिती यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली.
प्रगती अंध विद्यालय, बदलापुर येथिल दिव्यांग विद्यार्थ्यांनी कोळी गीत, गझल, बालगीत अशी अनेक गाणी गाऊन प्रदर्शनाची व विक्री केद्रांची शोभा वाढवली. तोरण, रुमाल पेंटिंग, कार्ड फुले, ग्रीटिंग कार्ड, कृत्रिम गजरे, ज्वेलरी, कागदी फुले, कापडी पिशवी, फाईल, दिव्यांग उपयोगी काठी व इतर सर्व वस्तूचे प्रदर्शन व विक्री करण्यासाठी एकूण १९ विक्री कक्ष (स्टॉल) उभारण्यात आले होते. या प्रदर्शनास भरघोस प्रतिसाद मिळाला. दिव्यांग विद्यार्थ्यांनी व शिक्षकांनी मेहनतीने वस्तू तयार केल्या त्याबद्दल शाबासकीची व कौतुकाची थाप दिव्यांग विद्यार्थ्यांना मिळावी असे प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांनी मनोगत व्यक्त करताना केले.
यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल, मा. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, प्रकल्प संचालक श्रीम. छायादेवी शिसोदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) श्री. अविनाश फडतरे, कार्यकारी अभियंता बाधंकाम श्री. सुनिल बच्छाव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री. वैजनाथ बुरडकर, समाज कल्याण अधिकारी श्री. संजय बागुल इतर सर्व अधिकारी, कर्मचारी, दिव्यांग शाळेचे विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.
विक्री मेळावा दि. २२ डिसेंबर २०२३ ते २६ डिसेंबर २०२३ या दरम्यान सकाळी ९.०० ते सायंकाळी ८.०० वाजेपर्यंत ठाणे शहराचे मध्यवर्ती ठिकाण असलेले जिल्हा परिषद, प्रांगण, ठाणे स्टेशन, ठाणे (प) येथे आयोजित केलेल्या दिव्यांग विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या वस्तू व प्रदर्शन फक्त वस्तू विक्रीसाठी नसून कलागुणांना वाव देण्यासाठी महत्त्वाचे ठरले आहे. विकास कर्णबधीर विद्यालय, किन्हवली या शाळेचे शिक्षक रत्नाकर सोनवणे यांनी सुत्रसंचालन करुन कार्यक्रमाची धुरा सांभाळली.