ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुपोषित मुलांची संख्या शून्यावर आणण्यासाठी “कुपोषण मुक्तीसाठी दत्तक- पालकत्व अभियान” जिल्हा परिषद ठाणे मार्फत राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत सद्यस्थितीत जिल्ह्यातील सॅम बालकांची संख्या ८३ तर मॅम बालकांची संख्या ११६१ इतकी आहे. जी पुढील सहा महिन्यात शून्यावर आणण्याचे जिल्हा परिषदेचे नियोजन असल्याने जिल्हा तसेच तालुका स्तरावरील सर्व अधिकारी यांना प्रत्येक एक बालक दत्तक देण्यात आले आहे.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांनी दि. २२ डिसेंबर २०२३ रोजी कुपोषित बालक गौतम बाळू वाघ यांच्या घरी भेट देऊन आरोग्य विषयक समस्या जाणून घेतल्या. तसेच आरोग्य तपासणी व पोषक आहार देऊन, पालकांसोबत चर्चा करण्यात आले. खराडे, निमन पाडा, प्रकल्प डोळखांब, शहापूर येथील अंगणवाडी येथे भेट देऊन
वजन काटा, पोशन आहार, विद्यार्थ्यांची हजेरी, अंगणवाडीतील पाणीपुरवठा इत्यादी सर्व सोयीसुविधाची माहिती घेतली. प्राथमिक आरोग्य केंद्र डोळखांब येथे बाल उपचार केंद्र येथे भेट देऊन आरोग्य विषयक सोयीसुविधांची पाहणी करण्यात आली.
यावेळी डोळखांब, शहापूर येथे मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनुज जिंदल, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (सा.प्र) श्री. अविनाश फडतरे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी श्री. संजय बागुल, अर्थ विभाग प्रमुख वैजनाथ बुरडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांच्या उपस्थितीत कुपोषित बालकांच्या आरोग्याच्या समस्या जाणून घेण्यासाठी सर्व अधिकारी यांनी दत्तक घेतलेल्या बालकांच्या घरी भेट दिली.
सर्व अधिकारी यांना कुपोषित दत्तक पालकत्व अभियानांतर्गत दत्तक घेतलेल्या बालकांचे पंधरा दिवसांनी संपर्कात राहून आरोग्य विषयक माहिती घेण्याच्या सूचना माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांनी दिले. गावातील अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, आरोग्य यंत्रणेचे डॉक्टर, परिचारिका, सुपरवायझर आदी सर्वांना कुपोषित बालकांच्या आरोग्य विषयक माहिती दररोज घेण्यासाठी गृहभेट देऊन माहिती घेण्यासाठी सूचना देण्यात आल्या. पालकांसोबत आरोग्य विषयक समुपदेशन करण्यासाठी, स्वच्छतेचे महत्त्व, पोषक आहार कुपोषित बालकाला दररोज मिळावे अशी काळजी घेतली जावी असे सांगण्यात आले.
