कर्करोग, ह्रदयरोग, किडणी अशा दुर्धर रोगाने पिडीत असणाऱ्या रुग्णांना आर्थिक मदत

ठाणे

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी यांचे आरोग्य सुरक्षितता व आर्थिक कल्याणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 100 (3) मधील तरतुदीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत सेस फंडातील निधीमधुन ग्रामीण भागातील कर्करोग, ह्रदयरोग, किडणी अशा दुर्धर रोगाने पिडीत असणाऱ्या रुग्णांना रु. 15,000/- पर्यंत आर्थिक मदत देण्यात येत आहे. 2023-2024 या आर्थिक वर्षाकरिता जिल्हा परिषद सेस फंडातील 5 लक्ष निधी देण्यात आले असून सदर योजनेचा लाभ थेट लाभार्थ्यास देण्यात येतो.

ग्रामीण भागात कर्करोग, ह्रदयरोग, किडणी अशा दुर्धर रोगाने पिडीत असणाऱ्या रुग्णांना आर्थिक पाठबळ मिळावे यासाठी सेस फंड निधीमधुन आर्थिक तरतुद केली आहे. कर्करोग, ह्रदयरोग, किडणी अशा दुर्धर रोगाने पिडीत असणाऱ्या रुग्णांनी अर्ज करावे व आर्थिक मदत घ्यावी असे आवाहन मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल यांनी केले आहे.

योजनेचे निकष

  1. रुग्ण हा आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील कर्करोग, ह्रदयरोग, किडणी या दुर्धर रोगाने पिडीत असावा.
  2. रुग्ण ग्रामीण भागातील रहिवासी असावा.
  3. रुग्ण हा भूमिहीन, अल्पभूधारक, दारिद्र रेषेखालील अथवा स्वातंत्र्य सैनिक असल्यास प्राधान्य देण्यात येईल.

ही कागदपत्र आवश्यक

  1. लाभार्थी रुग्णाने अथवा त्याच्या सुज्ञ नातेवाईकाने जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद ठाणे यांचे नावाने अर्ज सादर करणे आवश्यक आहे व अर्ज वैद्यकिय अधिकारी मार्फत सादर करण्यात यावे.
  2. अर्जासोबत लाभार्थी रुग्णाचा फोटो, ओळखपत्र जोडणे आवश्यक आहे.
  3. बँकेतील खाते पुस्तिकेची छायांकित प्रत जोडणे आवश्यक आहे.
  4. रुग्ण दुर्धर रोगाने पिडीत असल्याचे प्राधिकृत वैदयकीय संस्थेच्या तज्ञ डॉक्टरांचे अथवा जिल्हा शल्य चिकित्सकांचे प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

अधिक माहिती
अधिक माहितीसाठी नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात अथवा तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *