जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत गट – क सरळ सेवा भरती करण्यासाठी 5 ऑगस्ट 2023 रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. 25 ऑगस्ट 2023 पर्यंत इच्छुक उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. सरळ सेवा भरतीत विविध संवर्गातील एकूण 255 इतक्या पदांची भरती होणार असून उमेदवारांची ऑनलाईन परिक्षा जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत 7 ऑक्टोंबर पासून सुरू होत आहे. जिल्हा परिषद ठाणे व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकृत संकेतस्थळावर वेळोवेळी दिलेल्या सूचना उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे.
सदर ची परीक्षा एका दिवसात तीन सत्रात होणार आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांना परिक्षेच्या 7 दिवस आधी हॉल तिकीट उपलब्ध करून देण्यात येत आहे. परीक्षेसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांनी जिल्हा परिषद ठाणे व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकृत संकेतस्थळावरील आयबीपीएस द्वारे उपलब्ध करून दिलेल्या लिंकवरून हॉल तिकीट डाउनलोड करून घ्यावे.
सरळ सेवा भरती परिक्षा 7 ऑक्टोबर 2023 रोजी रिगमन दोरखंडवाला व वरिष्ठ सहाय्यक लेखा या पदाची परीक्षा घेण्यात येणार आहे तसेच 8 ऑक्टोबर 2023 रोजी विस्तार अधिकारी सांख्यिकी या पदाची परीक्षा घेण्यात येईल. पुढील परिक्षांसाठी वेळापत्रक वेळोवेळी जाहीर करण्यात येणार आहे. त्यासाठी उमेदवारांना जिल्हा परिषद ठाणे व जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकृत संकेतस्थळावरून माहिती घेण्याचे आवाहन मा. जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांनी केले आहे.
