बालकांच्या सुदृढ आरोग्यासाठी वेळोवेळी लसीकरण करण्यात यावे तसेच जिल्ह्यातील एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी मिशन इंद्रधनुष्य 5.0 मोहिम राबवण्यात येत आहे. विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0 मोहिम प्रभाविपणे राबविण्याकरीता जिल्हास्तरीय कार्यबल समिती सभा जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांच्या अध्यक्षतेखाली दि.27/07/2023 रोजी संपन्न झाली. सभेस उपस्थित मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.मनुज जिंदल यांनी आरोग्य विभागास जिल्हा परिषदेचे महिला व बाल विकास विभाग, शिक्षण विभाग व ग्रामपंचायत विभाग यांनी सहकार्य करावे अशी सुचना केली. या मोहिमेमध्ये ठाणे जिल्ह्यातील सर्व पालकांनी त्यांच्या बालकांचे लसीकरण पुर्ण करुन त्यांचे आरोग्य सुदृढ राखुन त्यांचे भविष्य सुरक्षीत करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांनी केले आहे.
ठाणे जिल्ह्यात नियमित लसीकरण कार्यक्रम अंतर्गत विशेष मोहिम इंद्रधनुष्य 5.0 संपूर्ण ठाणे ग्रामीण तसेच बदलापूर व अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रात तीन फेऱ्यांमध्ये राबविण्यात येणार आहे. सदर मोहिमेची प्रथम फेरी दि.07 ऑगस्ट 2023 ते 12 ऑगस्ट 2023 या कालावधीत नियोजित आहे. तसेच मोहिमेची व्दितीय फेरी 11 ते 16 सप्टेंबर 2023 व तृतीय फेरी 09 ते 14 ऑक्टोंबर 2023 दरम्यान राबविण्यात येणार आहे.
विशेष मिशन इंद्रधनुष्य 5.0 मध्ये 0 ते 2 वर्ष वयोगटातील लसीकरणापासून वंचित किंवा गळती झालेले लाभार्थी, 2 ते 5 वर्ष वयोगटातील ज्या बालकांचे गोवर रूबेला लसीचा पहिला व दुसरा डोस राहिला असेल तसेच डी.पी.टी व ओरल पोलिओ लसीचा बूस्टर डोस राहिला असेल त्यांचे लसीकरण, गर्भवती महिला तसेच 6 ऑगस्ट 2018 किंवा त्यानंतर जन्मलेल्या बालके यांचे लसीकरण करण्यात येणार असुन सदर मोहिमेच्या लाभार्थींची निश्चिती Head Count Survey व लसीकरणापासुन वंचित लाभार्थिंच्या यादीनुसार करण्यात आली आहे.
सदर मोहिमेमध्ये झिरो डोस सुटलेले व वंचित राहिलेले लाभार्थी असलेले क्षेत्र, गोवर आजारासाठी अति जोखमीचा भाग, नियमित लसीकरण कार्यक्रमांतर्गत नवीन लसीचा समावेश केल्यानंतर कमी काम असलेले क्षेत्र, जास्त दिवस नियमित लसीकरण सत्र न घेतलेले क्षेत्र, उपकेंद्राचे आरोग्य सेविकेचे पद तीन महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त आहे असे क्षेत्र, स्थलांतरित होणाऱ्या झोपडपट्ट्या, स्थायी शहरी व शहराला लागून असणाऱ्या झोपडपट्टी, गोवर घटसर्प व डांग्या खोकला सन 2022 वर्ष उद्रेक ग्रस्त भाग, लसीकरणास नकार देणारे तसेच प्रतिसाद न देणारे क्षेत्र यांवर विशेष लक्ष केंद्रित करुन लसीकरण सत्रांचे नियोजन करुन 100% लाभार्थिंचे लसीकरण करण्याचे ध्येय निश्चित केले आहे.