रोपवनाचे संगोपन, देखभाल व संरक्षण वेगवेगळ्या पद्धतीने करून रोपवनातील जिवंत रोपांची टक्केवारी वाढविण्यासाठी बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले आहे. ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मा. मुख्य कार्यकारी अधिकारी श्री मनुज जिंदल यांच्या मार्गदर्शनाखाली एकूण २३ हजार ५८० रोपे यंदाच्या पावसाळ्यात लावण्यात आली असून बिहार पॅटर्न अंतर्गत ५ हजार रोपे व लोक सहभागातून १८ हजार ५८० रोपे लावली गेली आहेत.
२०० रोपे लागवड करण्यासाठी १ कुटुंब असणे आवश्यक आहे. वृक्ष संगोपनासाठी संगोपन व संरक्षण २ वर्षे ९ महिन्यांसाठी आहे. तर प्रथम वर्षी जुलै ते मार्च असे ९ महिने, द्वितीय व तृतीय वर्षी प्रत्येकी १२ महिने याप्रमाणे आहेत.
कुटुंबांची निवड करताना वयोवृद्ध, विधवा, शारीरिकदृष्ट्या कमजोर, भुमिहीन इत्यादी कुटूंबांना प्राधान्य देण्यात आले आहे. पाच तालुक्यातील प्रत्येकी पाच ग्रामपंचायतीची निवड रोपे लागवड करण्यासाठी करण्यात आली आहे.
अंबरनाथ (असनोली, मंगरुळ, चारगांव, पोसारी, मुळगांव), भिवंडी (कुहे, चिंचपाडा, ब्राम्हनगांव, कान्हीवली, गणेशपूर्ती), कल्याण (आने, भिसोळ, रोहन, नडगांव, मानिवली, घोटसई), मुरबाड (कोलोशी, खाणीवरे, दहीगांव शे, सोनावळे, सिंगापूर), शहापूर (भावसे, शिरवंजे, शेरे, आंबर्जे, कळमगाव) या ग्रामपंचायतींची निवड करण्यात आली आहे.
पाच तालुक्यातील २३ हजार ५८० लावलेल्या रोपांची देखभाल, संगोपन, संरक्षण करण्यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात येत आहे. बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्षारोपण करण्यात आले असून लोक सहभागातून देखील या वर्षी विविध वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. तसेच लोकोपयोगी झाडांची यावर्षी मागणी करुन पुरवठा करण्यात आला आहे अशी माहिती ग्रामपंचायत विभाग प्रमुख प्रमोद काळे यांनी दिली.