दर वर्षी प्रमाणे 11 जुलै हा जागतीक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. कुटूंब नियोजन पध्दतींचा जनतेमध्ये प्रचार व प्रसार करण्यासाठी सदर महिन्यात पहिला टप्पा “दांपत्य संपर्क पंधरवडा 27 जुन ते 10 जुलै 2023” आणि दुसरा टप्पा “लोकसंख्या स्थिरता पंधरवडा 11 जुलै ते 24 जुलै 2023” राबविण्यात येतो. या दुस-या टप्यामध्ये प्रत्यक्ष कुटूंब नियोजनाच्या सेवा पुरविण्यावर भर दिला जातो. “लोकसंख्या स्थिरता पंढरवडा 11 जुलै ते 24 जुलै 2023” या कालावधीमध्ये तसेच वर्षभर खालील कुटुंब नियोजन पध्दतींच्या सेवा नागरिकांना पुरविण्यात येतात.
• स्त्री नसबंदी लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रिया- या शस्त्रक्रियेमध्ये पोटाच्या खाली एक लहान छेद घेऊन त्यातुन नळी घालुन गर्भनलीका रबरी धाग्याच्या मदतीने बंद केली जाते. शस्त्रक्रियेत टाके पडत नसल्याने या शस्त्रक्रियेला बिनटाक्याची शस्त्रक्रिया असे म्हणतात. ही शस्त्रक्रिया अत्यंत साधी व कमी वेळेत होणारी असुन लाभार्थी एक दिवसांनंतर स्त्री घरी जाऊ शकते.
• स्त्री नसबंदी मिनीलॅप शस्त्रक्रिया- या शस्त्रक्रियेमध्ये पोटाच्या खाली छेद करुन गर्भ नलीकेला टाके घालुन शस्त्रक्रिया केली जाते. या शस्त्रक्रियेमध्ये साधारण 2 ते 3 टाके पडतात. यामुळे या शस्त्रक्रियेला टाक्याची शस्त्रक्रिया असे म्हणतात.
• पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया- ही शस्त्रक्रिया महिला नसबंदी शस्त्रक्रियेपेक्षा अधिक सोपी असते. या शस्त्रक्रियेनंतर पुरुषाला 1 तासाने घरी जाता येते.
• अंतरा इंजेक्शन- गर्भधारणा नको असेल तर प्रत्येक तीन महिन्यांनी अंतरा इंजेक्शन घेता येते. हे इंजेक्शन सर्व शासकिय संस्थेत मोफत उपलब्ध आहे. अशी माहिती जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. स्वाती पाटील यांनी दिली.
गेल्या काही वर्षात स्त्रियांची नसबंदी आणि पुरुषांची नसबंदी यामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे नसबंदी विषयात पुरुषांपेक्षा महिला अधिक पटीने पुढे आहेत. आजही या विषयाला घेऊन महिला आणि पुरुष दोघांमध्ये मोठे गैरसमज असल्याचे दिसून येते. शस्त्रक्रियेनंतर कोणताही धोका नाही अधिकाधिक महिला व पुरुषांच्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया व्हाव्यात यासाठी आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू आहेत. स्त्री नसबंदी व पुरुष नसबंदी या दोन्हींना प्रोत्साहन देण्याकरिता प्राथमिक आरोग्य केंद्र मार्फत जनजागृती केली जात आहे. तसेच वेळोवेळी प्राथमिक आरोग्य केंद्रात शस्त्रक्रिया शिबिरे घेतली जात आहेत. अशी माहिती डॉ. गंगाधर परगे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.
कुटुंब नियोजनाच्या पध्दतींच्या अवलंबामुळे माता व बालक या दोघांचेही आरोग्य चांगल्या प्रकारे राखता येते. अनावश्यक गर्भधारणा, मातामृत्यू तसेच नवजात बालकांच्या आरोग्यावर होणारे नकारात्मक परिणाम टाळणे देखील कुटुंबनियोजनामुळे शक्य होते. याकरीता आपल्या नजिकचे प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामिण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे संपर्क साधुन अधिकाधिक जोडप्यांनी कुटुंब नियोजनाच्या विहीत पध्दती स्वीकार करण्याचे आवाहन श्री.मनुज जिंदल, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केले आहे.