गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजना शेतकऱ्यांना फायदेशीर

ठाणे


ठाणे जिल्ह्यात ‘गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ ही योजना यावर्षी पहिल्यांदा राबवली जात आहे. यापुर्वी या योजनेत केवळ इंधन खर्च देण्यात येत होता मात्र सध्या यंत्रसामग्री व इंधन खर्च ही देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तसेच गाळ वाहून नेण्यासाठी अल्प व अत्यल्पभूधारक शेतकरी, विधवा, अपंग आणि आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना जास्तीत जास्त १५ हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे.



राज्यातील जलसाठ्यांमध्ये अद्याप ४४ कोटी घनमीटर गाळ शिल्लक असल्याने राज्य सरकारने गाळ काढण्यासाठी ही योजना कायमस्वरूपी राबविण्याचा निर्णय घेतला आहे. ठाणे जिल्ह्यातील वसुंधरा संजीवणी मंडळ व भारतीय जैन संघटना या संस्थांच्या मदतीने काम करण्यात येणार आहे.


लघुपाटबंधारे विभागांतर्गत एप्रिल महिन्यात कामाचे सुरूवात करण्यात आले आहे. झिडके, कोन, केल्हे तालुका भिवंडी, टेंभा तालुका शहापूर, कुडवली तालुका मुरबाड येथे कामाची सुरुवात करण्यात आली असून १० हजार १८० घनमीटर गाळ काढण्यात आले आहे. भिवंडी, शहापूर, मुरबाड, अंबरनाथ, कल्याण या पाच तालुक्यात प्रथम टप्यात ३६ कामाची सुरुवात करण्यात येणार तर ७२ कामं पावसाळापुर्व करण्याचे नियोजन पुढील दोन दिवसात होणार आहे.

ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विकासासाठी गावतलावातील गाळ काढण्याची काम अजून वाढतील या कामांमुळे शेतकऱ्यांना मदत होईल तसेच त्यांना अनुदान देखील देण्यात येणार आहे. अशी माहिती लघुपाटबंधारे विभाग प्रमुख दिलीप जोकार यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *