मुरबाड तालुक्यातील कल्याण नगर राष्ट्रीय मार्गावर असलेल्या माळशेज घाटात भरधाव एस टी बस व ट्रक यामध्ये सावरणे गावाच्या हद्दीत असलेल्या वळणावर समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात एस टी बसमधील 15 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या सर्व जखमींना तातडीनं प्राथमिक आरोग्य केंद्र टोकावडे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
बस-ट्रकची धडक – पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार MH.20. BL. 2809 ही एस टी बस नगरकडून कल्याणकडे जात होती. तर मुरबाड तालुक्यातील टोकावडेवरुन MH. 14. HG. 4501 हा ट्रक जुन्नरच्या दिशेने जात होता. सोमवारी दुपारच्या सुमारास अचानक माळशेज घाटात भरधाव एस टी बस व ट्रकमध्ये सावरणे गावाच्या हद्दीत असलेल्या वळणावर समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता की बस रस्त्याच्या कडेला पलटी झाली. त्यामुळे एसटी बसमधील प्रवाशांना दुखापत झाली. तर ट्रकचा समोरील भाग चक्कचूर झाला होता.
जखमींना रुग्णालयात केले दाखल – घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी कल्याण नगर माहार्माग पोलिस व टोकावडे पोलिसाचे पथक पोहचले. त्यानंतर जखमींना शासकीय रुग्णवाहिकेतून नजीकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र जखमी प्रवाशाचे नावे समजू शकली नाही. या अपघाताची नोंद टोकावडे पोलिस ठाण्यात करण्यात आली असून अपघाताचा पुढील तपास टोकावडे पोलिस स्टेशनचे एपीआय सुनिल संसारे करत आहेत.
