Nashik News : कर्जाला कंटाळून सात वर्षांच्या मुलासह शेतकऱ्याने जीवन संपवलं, मालेगाव तालुक्यातील घटना

महाराष्ट्र




Nashik News : राज्यातील शेतकरी आत्महत्यांमध्ये (suicide) दिवसेंदिवस वाढ होत असून नाशिक (Nashik) जिल्ह्यातही मागील काही वर्षात शेतकरी आत्महत्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. अशातच मालेगाव तालुक्यातील धक्कादायक घटना घडली असून शेतकरी बापाने स्वतःच्या सात वर्षाच्या मुलासह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

मालेगाव (Malegaon) तालुक्यातील आघार बुद्रुक येथील ही घटना असून येथील यशवंत लक्ष्मण हिरे यांनी कर्जाला कंटाळून मुलगा आयुष हिरे याच्यासह विहिरीत उडी घेत आत्महत्या केली. गुरुवारी दुपारी अजंग शिवारात शेती महामंडळाच्या विहिरीत दोघांचे मृतदेह आढळून आले. घटनास्थळी उभ्या पिकअपमध्ये एक सुसाइड नोट सापडली. या चिठ्ठीत आम्ही कर्जबाजारी झाल्याने आत्महत्या (Suicide Note) करत असल्याचे नमूद केले आहे. हिरे यांच्या पश्चात पत्नी, मुलगी व आई असा परिवार आहे.

आघार बुर्द्रुक येथे यशवंत हिरे हे आपल्या कुटूंबियांसमवेत राहत होते. हिरे हे पशुखाद्य विक्रीचा व्यवसाय करत होते. गुरुवारी सकाळी ते मुलगा आयुष याला सोबत घेऊन पिकअपने मनमाड चौफुलीकडे गेले होते. ते चौफुलीवरून म्हशींना लागणारे खाद्य पिकअपमध्ये भरून निघाले होते. दरम्यान, त्यांची पिकअप अजंग-रावळगाव शेती महामंडळाच्या विहिरीजवळ बेवारस उभी असल्याचे आढळून आले. विहिरीलगत चपलांचे जोड पडलेले होते. दरम्यान परिसरातील नागरिकांना शंका आल्याने त्यांनी याची माहिती वडनेर खाकुर्डी (Vadner Khakurdi) पोलिसाना दिली.

दरम्यान वडनेर खाकुर्डी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून अग्निशमन दलाच्या मदतीने विहिरीत शोध घेतला असता यशवंत हिरे यांचा मृतदेह हाती आला. त्यानंतर आयुषचा मृतदेह मृतदेह बाहेर काढण्यात आला. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. रात्री उशिरा दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. हिरे कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून ऐन खरिपाच्या कालावधीत कर्ता पुरुष गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी वडनेर खाकुर्डी पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शेतकरी आर्थिक संकटात
गेल्या काही दिवसांपासून शेतकरी आत्महत्यांच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. एकीकडे शेतमालाला भाव नाही, दुसरीकडे घेतलेले कर्ज फेडण्यासाठी कुठलीच शक्यता डोळ्यासमोर दिसत नाही, हाती येणारे उत्पन्न अत्यंत कमी, अशी अनेक संकट समोर असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून टोकाचा निर्णय घेतलं जत असल्याचे चित्र आहे. अशातच गावात एका शेतकऱ्याने अशा पद्धतीने आत्महत्या झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *