ठेकेदार,मनपा प्रशासनाचेही दुर्लक्ष..
भिवंडी ( प्रतिनिधी ) भिवंडी शहर महानगर पालिका प्रशासनाने शहरातील नागरिकांसाठी उभारलेले
स्व.मीनाताई ठाकरे रंगायतन दुरुस्ती अभावी कुलूप बंद केल्याने नाटयप्रेमी रसिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. मागील दोन वर्षांपासून ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे रंगायतनाच्या दुरुस्तीचे काम अत्यंत संथगतीने सुरू असल्याने नाट्य रसिक नागरिक संताप व्यक्त करीत आहेत. रंगायतन दुरुस्ती कामात हलगर्जी पणा होत असल्यामुळे येथील नाटयप्रेमी नागरिकांनी भिवंडी संघर्ष समितीच्या माध्यमातून लेखी तक्रार सुध्दा केल्या आहेत.मात्र महापालिका आयुक्त प्रशासनाने त्यांच्या तक्रारी कडे सराईतपणे दुर्लक्ष केल्याने नाटयप्रेमी नागरिक मनोरंजन कार्यक्रमापासुन वंचित राहिले आहेत.नवीन नाटक व मनोरंजन कार्यक्रम पाहण्यासाठी नाटयप्रेमी नागरिकांना ठाणे,कल्याण, मुंबई सारख्या शहरात जावे लागत आहे. त्यामुळे वेळ व अर्थिक खर्च सोसावा लागत आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.तसेच नाट्यगृह दुरुस्तीच्या कामाची सुद्धा एसआयटीमार्फत सखोल तपासणी चौकशी व्हावी अशी मागणी होत आहे.
गेल्या 5 वर्षांपासून बंद असलेले स्व.मीनाताई ठाकरे रंगायतनाच्या दुरुस्तीच्या कामाला फेब्रुवारी 2023 मध्ये सुरुवात करण्यात आली होती.आ.महेश चौघुले यांनी श्रीफळ वाढवून दुरुस्ती कामाला सुरुवात केली होती.मात्र दुरुस्ती करणाऱ्या ठेकेदाराने दुरुस्ती कामात चालढकल केल्याने दोन वर्षांपासून या नाट्यगृहास टाळे ( कुलूप ) लागले आहे. दुरुस्ती काम अर्धवट झाले आहे. कामात कसुर केली तर ठेकेदारांचे बिल अदा करण्यात येणार नाही अशी तंबी देखील आयुक्तांनी ठेकेदाराला दिली होती मात्र ती हवेत विरल्याने ठेकेदाराचे फावले आहे. या नाट्यगृहाच्या दुरुस्तीची पाहणी अथवा माहिती माध्यमांना अथवा इतर संस्थांना, नाट्य रसिकांना होऊ नये यासाठी ठेकेदाराने हे नाट्यगृह संपूर्णतः पत्रे मारून बंदिस्त केले आहे. त्यामुळे नाट्यगृहाचे काम नेमकी किती झाले याबाबत कोणताही तपशील मिळत नाही.
