भिवंडीचा प्रवास गोदामनगरीतूनविकसित शहराच्या दिशेने,भूमी वर्ल्ड’च्या पुढाकाराने बीकेसीच्या धर्तीवर कॉर्पोरेट कार्यालये

भिवंडी

भिवंडी: आशियातील सर्वात मोठी गोदामनगरी असलेल्या भिवंडी शहर व तालुक्याचा प्रवास आता गोदामनगरीतून विकसित शहराच्या दिशेने सुरू झाला आहे. मुंबईतील बीकेसी'च्या धर्तीवर रांजणोली येथे कॉर्पोरेट कार्यालयाच्या इमारतीचे भूमिपूजन झाले आहे. भिवंडी शहरातील हा सर्वात मोठा कमर्शियल टॉवर असेल, अशी माहितीभूमी वर्ल्ड’चे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ठाणे-भिवंडी बायपास महामार्ग हा मुख्य आठ पदरी व चार पदरी सर्व्हिस रोड असा बारा पदरी होत आहे. भिवंडी-कल्याण मेट्रो मार्गाच्या लवकरच निविदा काढल्या जाणार आहेत. समृद्धी महामार्ग अंतिम टप्प्यात असून, बडोदा एक्सप्रेस-वेचे काम वेगाने सुरू आहे. बुलेट ट्रेनही भिवंडीतून जात आहे. देश व परदेशातील नामांकित कंपन्यांची गोदामे भिवंडी तालुक्यात आहेत. मुंबई-ठाण्यामधील व्यापारी जागांचे भाव वाढत असताना भिवंडीत व्यापारी व निवासी जागांचे आणि गोदामांचे दर मुंबई-ठाण्याच्या तुलनेत कमी आहेत. सध्या या भागात बड्या गृहनिर्माण कंपन्यांकडून संकुले उभारली जात आहेत. ठाणे-कल्याणच्या तुलनेत स्वस्त घरांमुळे लोकसंख्या वाढत आहे. या नागरिकांसाठी मल्टीप्लेक्स व मॉलही उभारले जात आहेत. त्यामुळे भविष्यात भिवंडीचा विकास सर्वाधिक वेगाने होईल, असा दावा श्री. प्रकाश पटेल यांनी केला. त्याचबरोबर पुढील काही महिन्यांत ठाणे-भिवंडी बायपासचे काम पूर्ण झाल्यावर वाहतूककोंडी कायमस्वरुपी संपुष्टात येईल, असा दावा श्री. प्रकाश पटेल यांनी केला.


भिवंडी तालुक्यातील `भूमी वर्ल्ड’च्या प्रकल्पात २५०० हून अधिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांची कार्यालये आहेत. दरवर्षी भिवंडी तालुक्यात १ कोटी चौरस फूटांहून अधिक गोदामांची निर्मिती होत आहे. तेथील व्यवस्थापनाबरोबरच शहरातील डॉक्टरांकडून डायग्नोसिस सेंटर, सी. ए. व वकिल यांच्याकडून आधुनिक सुविधांच्या धर्तीवर कार्यालयांची मागणी केली जात होती. त्यानुसार ठाणे-भिवंडी बायपास महामार्गावरील रांजणोली नाका येथे १५ मजली इमारत उभारली जाणार आहे. त्यात पहिल्या तीन मजल्यांवर रिटेल शॉपिंग संकुल, चौथ्या मजल्यावर बॅक्वेंट हॉल आणि ५ ते १३ व्या मजल्यांपर्यंत ५९५ कार्पेट क्षेत्राची ७२ कार्यालये, तर १४ व १५ व्या मजल्यावर रेस्टॉरंट उभारले जाईल, अशी माहिती प्रकाश पटेल यांनी दिली. या वेळी कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक नानजीभाई पटेल, कार्यकारी संचालक संदिप पटेल आणि सौ. गीता रामपरिहार यांचीही उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *