भिवंडी पूर्व विधानसभेत भाजपाने बनविले 6564 आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आणि त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष आपापल्या परीने विधानसभा मतदारसंघात जोमाने जनसंपर्कासाठी कामाला लागलेले आहेत.भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघात भाजपा निवडणूक प्रमुख संतोष शेट्टी यांनी यासाठी एक वर्षांपूर्वी वॉर रूम सुरू केले असून त्या माध्यमातून हजारो मतदारांशी दैनंदिन संपर्क साधून त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न केला जातो. भिवंडी पूर्व विधानसभा मतदारसंघातील तब्बल 6564 नागरिकांना आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड बनवून देण्यात आलेले आहे ज्या माध्यमातून त्यांना पाच लाख रुपये पर्यंत आरोग्य कवच मिळणार आहे.ही रक्कम एकत्रित तब्बल 328 कोटी रुपयांची होत आहे अशी माहिती भिवंडी पूर्व विधानसभा भाजपा निवडणूक प्रमुख संतोष शेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.कल्याण नाका येथील वॉर रूम येथे आयोजित या पत्रकार परिषद प्रसंगी शहराध्यक्ष अँड. हर्षल पाटील, सरचिटणीस राजु गाजंगी, प्रवीण मिश्रा,मोहन बल्लेवार,मोहन कोंडा,राकेश पटवारी आणि सौ.विभा पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.
महाराष्ट्र शासनाने नव्याने जाहीर केलेल्या
लाडकी बहीण योजनेमुळे भिवंडी शहरातील हजारो महिलांना याचा लाभ मिळणार आहे.त्याबद्दल राज्य शासनाचे विशेष अभिनंदन संतोष शेट्टी यांनी केले आहे.बचत गटातील महिलांच्या माध्यमातून लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन त्यांना या योजनेचा लाभ मिळवून देणार असून ,आयुष्यमान भारत कार्ड धारकांना भाजपा पदाधिकारी स्वतः घरी जाऊन हे कार्ड वितरीत करणार आहोत अशी माहिती संतोष शेट्टी यांनी शेवटी दिली. लाडकी बहीण योजनेचे अर्ज भरताना लाभार्थी महिलांनी कोणत्याही दलालांच्या भूलथापांना बळी पडू नये अशा लाभार्थी महिलांनी थेट भाजप कार्यकर्त्यांशी अथवा भाजप वॉर रूम शी संपर्क साधावा असे आवाहन देखील यावेळी संतोष शेट्टी यांनी केले आहे.