मा. कपिल पाटील यांच्या हस्ते ई- कार्ट लोकार्पण सोहळा संपन्न

भिवंडी

ई- कार्ट योजनेद्वारे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल- मा. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री श्री. कपिल पाटील

भिवंडी: मा. केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री  कपिल पाटील यांच्या हस्ते शेतकरी बचतगटांना ई- कार्ट लोकार्पण सोहळा दि. २७ फेब्रुवारी २०२४ रोजी दिवे-अंजूर, ता. भिवंडी येथे संपन्न झाला. जिल्हा परिषद कृषी विभागामार्फत सेस फंडातून सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात पद्मश्री सिंधुताई सपकाळ स्वाभिमान योजनेंतर्गत बचतगट यांना ई-कार्ट पुरविणे ही नाविन्यपूर्ण योजना राबविण्यात येत आहे.


       
जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत कृषी विभागातील ई-कार्ट योजनेचे काम संपुर्ण देशभर आदर्श ठरेल अशा पध्दतीने काम करण्याच्या सूचना मा. मंत्री महोदय यांनी शेतकरी गटाच्या सदस्यांना केल्या. यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्नात वाढ होईल. या योजनेतंर्गत शेतकरी बचतगटांनी स्वत: पिकवलेला भाजीपाला थेट ग्राहकांपर्यंत विकण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे ही आनंदाची बाब आहे. तसेच बचतगटांना स्वत:चे वाहन उपलब्ध झाल्याने वेळेची बचत होऊन स्वत:चा जास्तीत जास्त वेळ शेतीच्या व इतर कामासाठी देता येईल, वाहनामुळे दिवसभर भाजीपाला स्वच्छ व ताजा राहून भाजीपाला विक्रीचा पूर्ण मोबदला शेतकरी बचतगटांना होईल. शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेऊन विविध विभागांच्या योजनांचे अभिसरण करून शेतकऱ्यांनी लाभ द्यावा अशा सूचनाही मा. मंत्री महोदय यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. अशा प्रकारच्या योजनांमुळे ग्रामीण अर्थकारणामध्ये मोठ्या प्रमाणात बदल होऊन ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी नक्कीच मदत होईल असे मार्गदर्शन मा. मंत्री कपिल पाटील यांनी उपस्थितांना केले.
         
यावेळी मा. कपिल पाटील यांनी सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी स्वत: शेतकरी गटाने पिकवलेल्या सेंद्रीय भाजीपाल्याची खरेदी केली.
         
मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली या आर्थिक वर्षात जिल्हा परिषद, कृषी विभागामार्फत प्रायोगिक तत्वावर सदरची योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. या योजने अंतर्गत ग्राहकांना माफक दरात ताजा शेतमाल उपलब्ध होऊन भाजीपाल्याची नासाडी कमी होणार आहे. ई-कार्ट वाहनामुळे इंधन खर्चात बचत व प्रदुषणमुक्त वाहन उपलब्ध करण्यात आले आहे. तापमान नियंत्रित करण्यासाठी स्वयंचलित व्यवस्था (Mist Cooling) उपलब्ध आहे. सदर वाहनामध्ये भाजीपाल्याच्या प्रकारानुसार पध्दतशीर मांडणीसाठी व साठवणूकीसाठी अतिरिक्त व्यवस्था उपलब्ध असल्याची माहिती कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे यांनी दिली.
        
यावेळी देवेश पाटील, गुरूनाथ जाधव, गट विकास अधिकारी पंचायत समिती भिवंडी प्रदिप घोरपडे, सहाय्यक गटविकास अधिकारी इंद्रजित काळे, कृषी विस्तार अधिकारी निता गवळी, प्रिती संखे, बृहस्पती जावीर, विस्तार अधिकारी सुधाकर सोनवणे तसेच भारत नैसर्गिक शेती शेतकरी गटाचे सदस्य उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *