भिवंडीत १८ लाखांच्या प्रतिबंधित गुटख्यासह ४४ लाखांचा मुद्देमाल जप्त,ट्रक चालकास अटक

भिवंडी


भिवंडी : तालुक्यातील ठाणे – नाशिक वाहिनीवरील मानकोली ब्रिजजवळ नारपोली पोलिसांनी प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक करणाऱ्या ट्रकवर कारवाई करीत गुटखा जप्त करून ट्रकसह ४४ लाख ५३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून ट्रक चालकास अटक केली आहे.चेतनलाल सदरलाल साहू (२८) असे अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकाचे नाव असून त्याचे अन्य दोन साथीदार शौकत व सुशिल हे दोघे फरार झाले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ठाणे – नाशिक वाहिनीवरील मानकोली ब्रिजजवळून प्रतिबंधित गुटख्याची वाहतूक होणार असल्याची माहिती नारपोली पोलीस ठाण्याचे वपोनि मदन बल्लाळ यांना मिळाली होती,त्यानुषंगाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विठ्ठल बढे यांनी पोलीस पथकासह मानकोली ब्रिजजवळ ९ ऑक्टोबर रोजी रात्री २ वाजताच्या सुमारास सापळा रचून संशयित आयशर ट्रक क्र.सीजी ०४ पीसी ७९४८ ची झाडझडती घेऊन प्राथमिक तपासात सदर ट्रकमध्ये प्रतिबंधित गुटख्याची विक्री करण्याच्या हेतूने वाहतूक होत असल्याचे उघड झाले.त्यानंतर पोलिसांनी ट्रकमधील १८ लाख ९० हजार रुपये किमतीच्या प्रतिबंधित गुटख्याच्या ६७ गोणींसह ट्रक व १ मोबाईल असा एकूण ४४ लाख ५३ हजार ६०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.तर पोशि जनार्दन शिवाजी बंडगर यांच्या फिर्यादीवरून तिघांवर नारपोली पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ३२८,१८८,२७२,२७३ सह अन्न व सुरक्षा मानद कायदा २००६ व २०११ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून ट्रक चालक चेतनलाल यास ताब्यात घेऊन अटक केली आहे.त्यास न्यायालयात हजर केले असता १३ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.दरम्यान चेतनलाल याचे अन्य दोन साथीदार शौकत व सुशिल यांना पोलिसांची कुणकुण लागताच ते रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून फरार झाले आहेत.पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.पुढील तपास सपोनि विठ्ठल बढे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *