भिवंडी : कामगार डाईंग मशीनवर काम करत असताना त्याचा हात डाईंगमध्ये अडकल्याने तो मशीनच्या विळख्यात सापडल्याने गंभीर जखमी होऊन त्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना भिवंडीतील शेलार गावच्या हद्दीत गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली आहे.अजय नरेश मिश्रा (२४ रा.शेलार) असे डाईंग मशीनमध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे.याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास पाऊणे दोन वाजता मयत अजय व त्याचा मित्र सुनील राम चौथीराम हे दोघे शेलार येथील खेमीसती डाईंगमध्ये कपडा रोल करण्याच्या डेका मशीनवर काम करीत होते.त्यावेळी अजयचा हात रोलर मशीनमध्ये अडकल्याने तो कपड्यासह संपूर्ण रोल झाल्याने त्याचा डोका,पोट,छाती,मान,कंबर व पायाला गंभीररित्या मार लागून जखमी झाल्याने अतिरिक्त स्त्रावाने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.दरम्यान या घटनेची माहिती मिळताच तालुका पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह शवविच्छेदना करिता इंदिरा गांधी रुग्णालयात पाठवले आहे.याप्रकरणी सुनीलच्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास सपोनि संतोष बोराटे करीत आहेत.