सार्वजनिक गणेशोत्सव व ईद ए मिलादुन्नबी सणा दरम्यान सर्व सेवा सुविधा पुरविण्या साठी पालिका प्रशासन राहणार तत्पर: आयुक्त अजय वैद्य

भिवंडी




भिवंडी शहरात सार्वजनिक गणेशोत्सव व ईद-ए-मिलादुन्नबी हे सण मोठ्या उत्साहात साजरे होतात ही बाब लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे हाती घेतलेली असून ती लवकरच पूर्ण केली जातील त्यासोबत गणेश आगमन व विसर्जन मिरवणूक मार्ग,विसर्जन घाटांची दुरुस्ती,व त्या ठिकाणी अत्यावश्यक सेवा सुविधा पुरवणे आणि मुस्लीम बांधवांच्या ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणूक मार्गाची देखील दुरुस्ती करण्यात येणार असून,दोन्ही उत्सवांच्या दरम्यान नागरिकांना त्रास कमी होईल याची काळजी पालिका प्रशासन घेईल असा विश्वास पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी दिल आहे.ते शहरात सुरू होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव ईद-ए-मिलादुन्नबी या सणाच्या पूर्व तयारी साठी आयोजित बैठकीत बोलत होते.या बैठकीस भिवंडी पश्चिमचे आमदार महेश चौघुले,भिवंडी पूर्वचे आमदार रईस शेख,पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे,अतिरिक्त आयुक्त विठ्ठल डाके,सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष मदन भोई,भिवंडी ईद-ए-मिलादुन्नबी मिरवणूक समितीचे
शकील रजा,अन्य सदस्य भिवंडी शहरी व ग्रामिण पोलीस विभाग,वाहतूक पोलीस विभाग,पालिका अधिकारी उपस्थित होते.
भिवंडीत साजरे होणारे दोन्ही सण महत्वाचे आहेत. प्रामुख्याने ज्या मार्गा वरून मिरवणुका निघणार आहेत त्या मार्गाची रस्तादुरुस्ती,रस्त्यावरून वाहणाऱ्या ड्रेनेजची साफसफाई करणे, श्रीगणेश मंडपाच्या ठिकाणी साफसफाई स्वच्छता,विसर्जन घाटांवर वैद्यकीय आरोग्य पथक नेमून इत्यादी कामे विहित मुदतीत पूर्ण करण्याचा प्रयत्न सुरू आहे असे देखील पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत आमदार महेश चौघुले यांनी शहरातील गणेश विसर्जन मार्ग व घाटांची दुरुस्ती लवकरात लवकर करावी शहरातील प्रमुख सर्व रस्ते दुरुस्त करावेत अशी मागणी केली.तर आमदार रईस शेख यांनी विसर्जनाच्या सर्व व्यवस्था चांगली करण्यात यावी, घाटांवर जीवन रक्षक पथकांचे सुरक्षितता काळजी घेणे त्यांना आवश्यक सोयी सुविधा पुरवणे तसेच ईद-ए-मिलादुन्नबी निमित्त निघणाऱ्या मिरवणूक मार्गावर देखील रस्ता दुरुस्ती व त्या मार्गावर देखील सोयी सुविधा पुरविण्यात याव्यात यावर भर दिला.शहरातील वाहतुकीचा प्रश्न बिकट झाला आहे. दिवसा अनेक मोठी अवजड वाहन मुख्य रस्त्यावरून जात असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे, तसेच पार्किंग सोय उपलब्ध करून देणे,अनधिकृत रिक्षा स्टॅन्ड याबाबत देखील चर्चा झाली. सणाचे दिवस लक्षात घेऊन या मार्गा वरील वाहतुकीचे प्रश्न लवकरात लवकर सोडवावेत अशी मागणी आमदार रईस शेख यांनी प्रसंगी केली. याबाबत वाहतूक विभागाकडे पाठपुरावा करावा अशा सूचना देखील करण्यात आल्या. दोन्ही सण हे महत्त्वाचे असल्याने आपण सर्वांनी आनंदाने सण साजरे करावेत, सणाच्या पार्श्वभूमीवर पालिका मूलभूत सोयीसुविधा पुरवेल आणि तसेच पोलीस प्रशासन योग्य तो बंदोबस्त ठेवेल असा विश्वास सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष मदन भोई यांनी व्यक्त केला.दोन्ही धर्माच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *