सुविधांचा लाभ घ्यावा पालिका आयुक्त अजय वैद्य यांचे आवाहन
भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रामध्ये दि. १७ सप्टेंबर २०२३ ते दि. ३१ डिसेंबर २०२३ या दरम्यान “आयुष्मान भव मोहिम” राबविणेत येणार आहे. सदर मोहिमेचे उद्घाटन सोहळा भिवंडी महानगरपालिकेचे आयुक्त मा. अजय वैद्य सो. यांचे हस्ते दि. १३/९/२०२३ रोजी नदीनाका आरोग्य केंद्र येथे संपन्न झाला. सदर उद्घाटन प्रसंगी डॉ. सोनावणे, एडीएचएस (मलेरिया), डॉ. बुशरा सय्यद (वैद्यकिय आरोग्य अधिकारी), डॉ. विद्या शेट्टी (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. प्रिया फडके (शहर कार्यक्रम व्यवस्थापक) व डॉ. रूकय्या कुरेशी (नदीनाका आरोग्य केंद्र) जनसंपर्क अधिकारी मिलिंद पडले तसेच आरोग्य कर्मचारी व प्रभाग समिती क्र. ०1 चे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.
केंद्र शासनाची आयुष्यमान भव ही मोहीम महानगरपालिकेच्या सर्व १५ आरोग्य केंद्रामार्फत राबविली जाणार आहे. सदर मोहिमेमध्ये नागरीकांकरीता आरोग्य मेळावे घेण्यात येणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने स्त्रीरोग, बालरोग, नेत्ररोग, कान, नाक व घसा, त्वचारोग, मानसिक आजार, दंत शल्यचिकित्सक, टेलीकन्सलटेशन इ. तज्ञ डॉक्टरांचे मार्फत मेळाव्यांमध्ये आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत व १८ वर्षांवरील पुरूषांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. तसेच सदर मेळाव्यांमध्ये आयुष्यमान कार्डाचे म्हणजेच आभा कार्ड, पी एम जे वाय कार्ड वितरण करणेत येणार आहे व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतंर्गत संलग्न असलेल्या रूग्णालयांची यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. सर्व नागरीकांना आवाहन करणेत येते की, जास्तीत-जास्त नागरीकांनी पालिकेच्या आरोग्य केंद्रांवर जाऊन सर्व आरोग्य सुविधांचा लाभ घ्यावा योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन पालिका आयुक्त अजय वैद्य यांनी केले आहे