ठाणे जिल्ह्यातील १६ लाख गरजू नागरिकांची प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत नोंदणी झाली असून लवकरच ही यादी केंद्र शासनाकडून जिल्हा प्रशासनाला प्राप्त होणार आहे. यानुसार या लाभार्थ्यांना ‘
आयुष्मान कार्डचे वितरण होणार असून वर्षभरात पाच लाखांपर्यंत वैद्यकीय उपचाराचा लाभ त्यांना घेता येईल, अशी माहिती जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आली.

जिल्ह्यात १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘आयुष्मान भव’ मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेची अंमलबजावणी करताना सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवा, अशी सूचना जिल्हाधिकारी श्री. अशोक शिनगारे यांनी केली. जिल्हाधिकारी कार्यालयात दि. ३१ ऑगस्ट २०२३ रोजी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मनुज जिंदल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे, निवासी संपर्क अधिकारी जिल्हा सामान्य रुग्णालय ठाणे डॉ. मृणाली राहुड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भारत मसाळ यांच्यासह शिक्षण विभाग, ग्राम पंचायत, महिला व बाल कल्याण विभाग मधील जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते.
विशेष मोहिमेंतर्गत आयुष्मान आपल्या दारी ३.०, आयुष्मान सभा, आयुष्मान मेळावा आणि अंगणवाडी व प्राथमिक शाळांमधील मुलांची तपासणी करण्यात येणार आहे. आरोग्यविषयक उपक्रम, मोहिमा राबविताना सर्वसामान्याच्या आरोग्यविषयक समस्या सोडवण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकारी या वेळी म्हणाले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी यावेळी मोहिमेचे सादरीकरण करताना, १ हजार ३६५ आजारांचा समावेश यात करण्यात आल्याचे सांगितले.
कार्यक्रम नियोजन
आयुष्मान सभा उपक्रमांतर्गत आयुष्मान कार्ड व आभा कार्ड विषयी जनजागृती करणे, आरोग्यवर्धीनी केंद्रामार्फत असंसर्गजन्य रोग, सिकलसेल, लसीकरण याविषयी जनजागृती करण्यात येणार आहे. ‘आयुष्यमान मेळावा’ उपक्रमाअंतर्गत आयुष्मान भारत आरोग्यवर्धीनी केंद्रावर दर आठवड्यातील शनिवार किंवा रविवारी विविध आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय स्तरावर वैद्यकीय महाविद्यालयांमार्फत आरोग्य मेळाव्यांचे आयोजन करण्यात येईल.