भिवंडी दि.१८ पिस्टल व जिवंत काडतुसे घेऊन जाणाऱ्या दोघांना नारपोली पोलिसांनी सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली आहे.सुनिल मंगल डब (४३ रा.उत्तर पूर्व,दिल्ली), कृणाल किसनलाल वाल्मिक (२५ रा.हरिद्वार,उत्तराखंड) अशी अटक करण्यात आलेल्या पिस्टल धारकांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,उत्तरप्रदेश हत्याकांडाच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार ३ एप्रिल २०२३ ते १९ एप्रिल २०२३ पर्यंत कोणतेही घातक शस्त्र अगर अग्निशस्त्र बाळगण्यास मनाई करण्यात आली होती.मात्र असे असतानाही दोघे जण पिस्टल व जिवंत काडतुसे घेऊन ठाण्याच्या दिशेने जाणार असल्याची खबर नारपोली पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार यांना मिळाली होती,त्यानुषंगाने त्यांनी पोलीस पथकासह मुंबई- नाशिक महामार्गावरील मानकोली ब्रिजखालील अरुणकुमार क्वॉरीच्या समोर पाळत ठेवून सापळा रचून सुनिल आणि कृणाल यांना ताब्यात घेतले.त्यांच्यावर पोलीस शिपाई योगेश शिवाजी क्षीरसागर यांच्या फिर्यादीवरून नारपोली पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे.
आरोपींना न्यायालयात हजर केले असता २४ एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्याकडून १ लाख ६ हजार १०० रुपये किंमतीचे २ पिस्टल व १ जिवंत काडतुस जप्त केले आहे.तर आरोपी घातपाताच्या उद्देशाने शस्त्र बाळगून होते का ? आरोपींचा कोणत्या कुख्यात टोळीशी संबंध आहे का ? या दिशेने पोलिसांनी तपास सुरु केला आहे.या घटनेचा पुढील तपास पोऊनि रोहन शेलार करीत आहेत.