भिवंडी:डोंगराच्या पायथ्याजवळ व नदी किनाऱ्या जवळून तसेच पावसाळ्यात सदर भागात पूर्णतः पाणी साचून चिखल व दलदलं निर्माण होऊन भिवंडी तालुक्यातील मैंदे, वळणाचा पाडा, बिजपाडा या गावांमध्ये वाहतुकीस अडथळा तसेच रहदारी करताना त्रास होत होता त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज मा. कपिल पाटील यांच्या संकल्पनेतून राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान नाविन्यपूर्ण योजनेतून ‘के 31’ तंत्रज्ञान वापरून एकूण 1.719 किमी लांबीचा रस्ता तयार करण्याचे काम यशस्वीरित्या पुर्ण करण्यात आले आहे.
मा. मुख्य कार्यकारी अधिकारी मनुज जिंदल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रुपाली सातपुते याच्या मार्गदर्शनाखाली देशात पहिल्यांदा प्रायोगिक तत्वावर मैंदे, वळणाचा पाडा, बिजपाडा येथे रस्ता तयार करण्यात आला आहे.
पंचायती राज या केंद्रीय विभागाकडील राष्ट्रीय ग्राम स्वराज्य अभियान नाविन्यपूर्ण योजनेतून स्वतः मा मंत्रीमहोदय यांनी निधी उपलब्ध करून दिला. या रस्त्यामुळे ग्रामीण भागातील कृषी व आर्थिक विकासास चालना मिळून लोकांच्या उत्पन्नात भर पडणार आहे.
के 31 तंत्रज्ञान हे पर्यावरण पूरक पारंपारिक रस्ते बांधणी प्रक्रियेपेक्षा रास्त व अधिक प्रभावी रस्ते बांधणी तंत्रज्ञान असून ठाणे जिल्हा परिषदेमार्फत प्रथमतः सदर तंत्रज्ञानाचा वापर करून वरील रस्त्याचे प्रायोगिक तत्त्वावर काम करण्यात आले आहे. रस्ता तयार केल्यामुळे स्थानिक शेतकरी, व्यापारी, विद्यार्थी व ग्रामस्त यांना दळणवळणासाठी उपयुक्त ठरणार आहे
सदर कामाचे अंदाजपत्रकामध्ये एकूण 1.719 किमी लांबी मध्ये रस्त्यासाठी माती मुरमाचा भराव करून त्यावर मऊ मुरूम आवश्यक त्या लांबी रुंदी मध्ये पसरवून त्यामध्ये के ३१ एपीएस केमिकल व पाणी आवश्यकतेप्रमाणे मिक्स करून मऊ मुरमामध्ये रोटावेटरने मिसळून त्यावर रोलर ने दबाई करून सॉईल स्टॅबिलायझेशन करण्यात आले आहे. त्यावर 20 मि मी बिटुमिनस काँक्रीट करणे व आवश्यक 6 ठिकाणी 900 व 600 मि मी व्यासाच्या पाईप मोर्या काँक्रीट हेडवाल सह तयार करणे तसेच रोड फर्निचर तयार करणे इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
तसेच या कामासाठी 200 लक्ष निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्यासाठी रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी व सर्वेक्षण करून वस्तुनिष्ठ स्वरूपाचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. पारंपारिक पद्धतीने 1719 किमी लांबीच्या सिमेंट काँक्रीट रस्ता बनविण्यासाठी साधारणतः 374 लक्ष इतका निधी खर्च करावा लागला असता तर के ३१ तंत्रज्ञान वापरून रस्त्याच्या कामासाठी 200 लक्ष निधी वापरण्यात आला आहे म्हणजे साधारणतः 173 लक्ष इतकी बचत झालेली आहे ती एकूण खर्चाच्या 86 टक्के इतकी आहे म्हणजे ३० टक्के खर्च कमी होतो अशी माहिती कार्यकारी अभियंता बांधकाम विभाग प्रमुख दत्तु गिते यांनी दिली.