भिवंडी: देशाचे प्रधानमंत्री भारतातील कोट्यवधी जनतेला शौचालय उपलब्ध करून दिल्याच्या जाहिरात बाजी करत असतानाच भिवंडी तालुक्यातील एका ग्रामपंचायती मधील दिव्यांग कुटुंबावर
आपल्या वैयक्तिक शौचालयाच्या अनुदानासाठी पंचायत समितीला तब्बल दोन वर्षांपासून हेलपाटे मारण्याची नामुष्की ओढवली आहे.
तालुक्यातील सुपेगाव येथील धनंजय रामदास पाटील हे दिव्यांग आपल्या दिव्यांग पत्नी व पाच वर्षीय मुला सोबत वास्तव्य करीत आहेत. त्यांचे वैयक्तिक शौचालय बनवण्यासाठी 2021 पासून ग्रामपंचायत व पंचायत समिती येथे अर्ज विनंती केली आहे.परंतु आज पर्यंत या कुटुंबास वैयक्तिक शौचालय काही मंजूर झालेच नाही.दुर्दैव म्हणजे दिव्यांगां साठी जो पाच टक्के निधी असतो तो निधी सुद्धा या कुटुंबाला मिळाला नसल्याने वासुदेव धनंजय पाटील अक्षरशा रडकुंडीस आला आहे. दोन हातात कुबड्या घेत धनंजय पंचायत समितीचा उंबरठा झीजवत फिरत आहे. सोमवारी आठवड्यातील कामकाजाचा पहिला दिवस असल्याने धनंजय पाटील कार्यालयात आला असता या ठिकाणी गटविकास अधिकारी व इतर बरेचसे अधिकारी रजेवर गेल्यामुळे त्याला पुन्हा निराश होऊन आपल्या घरी माघारी जाण्याची वेळ आली आहे.
पंतप्रधान मोदी साहेबांची सर्वांना शौचालय ही घोषणा फक्त कागदावर जाहिराती साठी आहे का असा सवाल उपस्थित करीत काही दिवसांवर पाऊस येऊन ठेपलेला आहे.
पावसाळ्यात गवत झाडी झुडपं वाढल्यानंतर सुद्धा आम्ही उघड्यावरती शौचालयास जायचं का ? मला नक्की वैयक्तिक शौचालय अनुदान कधी मंजूर होणार असा प्रश्न विचारताना धनंजय पाटील यांच्या डोळ्यात दुःखाश्रू तरळून गेले.धनंजय पाटील यांचे प्रकरण मला समजताच फेब्रुवारी मध्ये पुन्हा नव्याने वैयक्तिक शौचालय अनुदानासाठी जिल्हा प्रशासनाकडे नाव पाठविले आहे.तर मागील वर्षीचे दिव्यांग अनुदान मंजूर झाले आहे अशी माहिती सुपेगाव ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक चेतन कडव यांनी दिली आहे.
