भिवंडी: नांदेड जिल्ह्यातील अक्षय भालेराव या तरुणाच्या हत्याकांडप्रकरणी दोषींना फाशीची शिक्षा व्हावी,याकरिता भिवंडी आरपीआय गटाच्या वतीने भिवंडी प्रांतांना सोमवारी निवेदन सादर करण्यात आले आहे.नांदेडमधील बोंडाहवेली येथील भालेराव कुटुंबीयांनी बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केल्याने त्या गावातील काही समाजकंटक तरुणांनी कुटूंबीयांना एका लग्न वरातीत गाठून बेदम मारहाण केली होती.या मारहाणीत भालेराव कुटुंबातील अक्षय भालेराव या तरुणाची समाजकंटकांनी धारदार शस्त्राने हत्या केली आहे.तर या हत्येप्रकरणी पोलिसांनी संतोष तिडके,दत्ता तिडके या दोघांसह ८ जणांना ताब्यात घेतले आहे.परंतु यापैकी बाबुराव तिडके हा आरोपीत सामाजिक माध्यमांवर आम्ही खून केले असता पोलिसांनी आम्हाला काय केले ? ३०२ लावले आहे ना, असे बोलून कायद्याचे तिन तेरा वाजवत असल्याचे भिवंडी आरपीआय गटाने निवेदनातून सांगितले आहे.त्यामुळे आरोपींमध्ये कुठल्याही प्रकारचा कायद्याचा धाक नसल्याचे यावरून दिसून येत असल्याने सदरचे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात वर्ग करून आरोपींना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी,अशी मागणी भिवंडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे शहर जिल्हा अध्यक्ष महेंद्र सिताराम गायकवाड,उपाध्यक्ष सुनील वाघमारे, सेक्रेटरी लक्ष्मण उबाळे,खजिनदार अशोक श्रीमल,वि.बी.गणेश,संघटक सचिव आनंद सोळसे, संरक्षण प्रमुख रमेश येलगटी, सह संघटक गौतम शिरसाट,जगन शिंदे,प्रवक्ता बाबासाहेब लांडगे,सल्लागार दिगंबर गायकवाड, कायदे विषयक डॉ.विजय पटेल,सदस्य लिंबाजी वाघमारे,चांगदेव बंजारे या शिष्टमंडळाने उप विभागीय अधिकारी अमित सानप यांना निवेदनाद्वारे केली आहे.