भिवंडी :दोन अज्ञात ईसमांनी पोलीस असल्याचे भासवून एकाच दुचाकीने भिवंडीकडे जाणाऱ्या दोन तरुणांना थांबवून ते जात असलेल्या रस्त्यावर गुन्हेगारी वृत्तीच्या घटना घडल्याचे सांगून त्यांच्याकडून हातचलाखीने सोन्याची चैन लंपास केल्याची घटना माणकोली ब्रिजजवळून समोर आली आहे.या चोरीप्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात दोन अज्ञात ईसमांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बाबू विलास बोरचटे (३२ रा.दातीवली रोड,दिवा पूर्व) आणि त्याचा मित्र सचिन महादेव मांजरेकर हे दोघे माणकोली येथील ब्लु डार्ट कंपनीमध्ये काम करत आहेत.दरम्यान ते रविवारी सकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास भिवंडीत कामावर जाण्यासाठी निघाले होते.त्यावेळी ते माणकोली ब्रिजच्या ३० मिटर पाठीमागे असताना रस्त्यात त्यांना दोन अज्ञात तरुण भेटले असता,तरुणांनी दुचाकीस्वारांना गाडी थांबवण्यास सांगितली.त्यानंतर पोलिस असल्याची बतावणी करून तोतया पोलिसांनी दुचाकीस्वारांना विश्वासात घेत तुम्ही कोठे जात आहेत ? तुम्ही रस्त्यावर फिरू नका,काल रात्रीच इथे दरोडा आणि खुनाची घटना घडल्याचे सांगून बाबू बोरचटे यास गळ्यातील चैन काढून खिशात ठेवण्यास सांगितली.त्यामुळे त्याने चैन खिशात ठेवण्यासाठी काढली असता तोतया पोलिसांनी बाबू ह्याची ६५ हजार रुपये किमतीची चैन कागदात गुंडाळून देण्याच्या बहाण्याने हातचलाखीने लंपास केली आहे.बाबू बोरचटे याच्या फिर्यादीवरून तोतया पोलिसांवर नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नारपोली पोलीस करीत आहेत.
