भिवंडी: ठाणे जिल्हा परिषदेचे शिक्षण अधिकारी आणि भिवंडी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात भिवंडीतील दोन शाळांना अनधिकृत घोषित करून त्या शाळा बंद करण्यासाठी संस्था चालकांना नोटीस बजावली होती.मात्र असे असतानाही शाळा सुरूच ठेवल्याने या दोन्ही शाळांच्या संस्था चालकांच्या विरोधात कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,कोनगाव पोलीस हद्दीतील अग्निमाता इंग्लिश स्कुल पिंपळास (भिवंडी) आणि समर्थ विद्यालय पिंपळनेर,(तलाईपाडा,भिवंडी) या दोन शाळा काही वर्षांपासून अनधिकृतपणे सुरू असल्याची माहिती ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाला मिळाली होती.त्यानुषंगाने ठाणे जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी आणि भिवंडी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी यांनी वरील दोन्ही शाळांच्या संस्था चालकांना नोटीस बजावून शाळा बंदीचे आदेश दिले होते.परंतु संस्था चालकांकडून शाळा बंद न करता शाळा अवैधपणे सुरूच होत्या.त्यामुळे अखेर १ जून २०२३ रोजी भिवंडी पंचायत समितीच्या काल्हेर बिट क्र.३ च्या शिक्षण विस्तार अधिकारी वैशाली सुनिल डोंगरे ( ४७ रा.कल्याण) यांच्या फिर्यादीवरून दोन्ही शाळा संस्था चालकांवर कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोऊनि जिवन शेरखाने करीत आहेत.
