भिवंडी : अपहरणाचा गुन्हा दाखल झालेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचा भिवंडीतील शांतीनगर पोलीस शोध घेत होते.परंतु कुटुंबियांनी मुलाला दमदाटी केल्याने त्याचा राग मनात धरून सकाळी मदरशात जाण्यासाठी जातो असे सांगून तो एकटाच ट्रेनने यूपीला आजीकडे पळून गेल्याचे भिवंडीतून समोर आले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मुमताज अहमद शेख हे भिवंडीतील गायत्रीनगर भागातील अहमद बेकरीच्या मागे भाड्याच्या खोलीत पत्नी, तीन मुली आणि एक मुलगा अशा पाच जणांसह राहत आहेत.दरम्यान ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मजुरीचे काम करत आहेत.२७ मे रोजी शनिवारी सकाळी मुमताजचा मुलगा झिशान (१४) मदरशात शिकण्यासाठी घरून निघाला, मात्र परत आला नाही.त्यानंतर कुटुंबीयांनी त्याचा शोध सुरू केला.परंतु त्याचा ठावठिकाणा न लागल्याने मुलाच्या आईने अखेर शांतीनगर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली.त्यानुषंगाने २८ मे रोजी मुलाच्या अपहरणाचा गुन्हा दाखल केल्यानंतर त्याचा शोध सुरू होता.दरम्यान,२९ मे रोजी बेपत्ता मुलाचे अपहरण झाले नसून तो स्वत:च उत्तर प्रदेश येथील आजीकडे पळून गेल्याचे पोलिसांना दुसऱ्या दिवशी कळले.पोलिसांनी सांगितले की,झिशान शुक्रवारी मध्यरात्री १२ वाजता खेळाला गेला होतो,त्यानंतर तो रात्री उशिरापर्यंत बाहेर राहिल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याला शिवीगाळ केली.इतकेच नाही तर मुलाचे वडील त्याच्या या मनमानी कृत्याची त्याच्या मदरशात तक्रार करणार होते.त्यानंतर झिशान शनिवारी सकाळी ७ वाजता घरात कुटुंबियांकडून झालेल्या अपमानाचा मनात राग धरून मदरशात जाण्यासाठी निघाला,परंतु मदरशात जाण्याऐवजी त्याने कल्याण स्टेशन गाठले आणि तेथून त्याने ट्रेन पकडली आणि थेट यूपी गाठले.उत्तर प्रदेशातील आजीचा त्याच्या कुटुंबियांना फोन आल्यानंतर त्यांना ही गोष्ट कळली.त्यानंतर कुटुंबीयांसह पोलीस खात्याने सुटकेचा निश्वास घेतल्याची माहिती शांतीनगर पोलीस ठाण्याचे पोऊनि निलेश जाधव यांनी दिली आहे.