भिवंडी महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपत्कालीन परिस्थिती उद्भवून नागरिकांचे आरोग्याचे आर्थिक व जिवित नुकसान होवू नये या उद्देशाने भिवंडी शहरातील प्रभाग समिती निहाय नाले, गटारे साफसफाई प्रथम प्राधान्याने करण्याकरिता भिवंडी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी आज महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये सर्व संबंधीत महानगरपालिका अधिका-यांसमवेत नाले सफ़ाई बाबत आढावा बैठक घेतली. सदर बैठकीस उपआयुक्त (मुख्यालय) दिपक झिंजाड, शहर अभियंता सुनिल घोगे हे उपस्थित होते.
सदर आढावा बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी सबंधीत अधिका- यांना मार्गदर्शन करतांना म्हटले की, भिवंडीमध्ये कोणत्याही पध्दतीची आपत्कालीन परिस्थिती उद्भवू नये आणि शहरामध्ये भविष्यांत अशा कोणत्याही स्वरुपाच्या दुर्घटना घडणार नाहीत यासाठी शहरातील पाणी भरणा-या व प्रभाग समिती निहाय मुख्य रस्त्यालगत व आतील भागात असणारे मुख्य नाले व गटारे यांची प्रथम प्राधान्याने साफ़-सफ़ाई करुन ज्या ठिकाणी जेसीबी व पोकलनच्या सहाय्याने साफ़ सफ़ाई करावयाची आहे अशा ठिकाणची सफ़ाईसंदर्भात पुर्ण कामे विहीत वेळेत पूर्ण करुन घेणे अत्यंत आवश्यक आणि तितकेच महत्वाचेही आहे. पावसाळ्याचे दिवस जवळ येत असल्याकारणाने सदरची सर्व कामे तातडीने पावसाळ्यापूर्वी करुन घेण्याची जबाबदारी ही सर्व अधिका-यांची आणि तितकीच ठेकेदारांचीही आहे. आपल्या हातात सफ़ाईसाठी दिवस कमी उरल्याने अतिरिक्त मजूर लावण्याच्या सुचना सबंधीत ठेकेदारांना द्याव्यात किंवा त्या ठेकेदारांनी जास्तीत जास्त मजूर पुरवून सफ़ाईचे काम वेळेत पूर्ण करुन घ्यावे ही ठेकेदारांची जबाबदारी आहे. त्यादृष्टीने ठेकेदारांनी काम न केल्यास अशा ठेकेदारांवर जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात येईल याची गांभिर्यपूर्वक नोंद घ्यावी आणि आपले शहर आपत्कालिन परिस्थिती पासून मुक्त होईल यासाठी सर्वांनी सातत्याने अशा सफ़ाईच्या कामात प्रयत्नशिल रहायला हवे असे त्यांनी मार्गदर्शन करतांना स्पष्ट सुचनाही दिल्या.
नाला सफाई बैठकप्रसंगी प्रभाग अधिकारी, सुदाम जाधव, फ़ैसल तातली, सोमनाथ सोष्टे, गिरीष घोष्टेकर, अनिल प्रधान, आरोग्य विभाग प्रमुख, प्रभागातील अभियंता व संबंधित सर्व आरोग्य निरिक्षक उपस्थित होते.
