वऱ्हाळदेवी तलाव परिसर बनला मद्यपींचा अड्डा,प्रशासनाचे दुर्लक्ष ,नागरिकांची कारवाईची मागणी

भिवंडी

भिवंडी शहराची तहान भागवणाऱ्या प्रसिद्ध वऱ्हाळ देवी तलावाच्या चौफेर बागेला दारुड्यांनी आपले अड्डे बनवले आहे.या ठिकाणी अंधार पडताच रात्री उशिरापर्यंत मद्यपींची पार्टी आयोजित केली जाते.इतकेच नाही तर दारू पिल्यानंतर बाटल्यांचा खच परिसरात विखुरलेल्या अवस्थेत दिसतात.दरम्यान असे असतानाही कारवाई करण्याबाबत पोलीस किंवा महापालिका प्रशासन उदासीन आहे.त्यामुळे तलावाच्या काठावर मद्यपींची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.त्यामुळे दारुड्यांवर कडक कारवाईची मागणी नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.तर भिवंडी शिवसेना ठाकरे गटाचे शहरप्रमुख प्रसाद पाटील यांनी सांगितले की, धामणकरनाका ते मानसरोवर – कामतघर दरम्यान शेकडो एकरमध्ये वऱ्हाळ देवी तलाव पसरलेला असून त्याभोवती महापालिकेने नागरिकांना चालण्यासाठी व बसण्यासाठी उद्यान तयार केले आहे.मात्र सदर ठिकाणी मद्यपी बाहेरून स्वस्त दरात दारू आणि इतर खाद्यपदार्थ आणून तलावाच्या बागेत दारू पिण्यात गुंग होतात. दारूच्या सामुग्रीसह दारू पिणाऱ्यांची पार्टी होते.मंद प्रकाशात, गार वाऱ्याच्या झोतामध्ये दारुड्यांची पार्टी सजते.दारू पिण्यास बंदी असतानाही बेधडकपणे मानसरोवर ते कामतघर दरम्यान रात्री ७ ते १२ वाजेपर्यंत दारू पिणारे मद्यपान संपवतात.तर अनेक जण दारूच्या बाटल्याही तलावात फेकतात.त्यामुळे तलावाच्या काठावर चौफेर दारूच्या बाटल्यांचा खच निर्माण झालेला आहे.त्यामुळे तलावात उतरल्यानंतर या फुटलेल्या बाटल्यांच्या काचांचा खच नागरिकांच्या पायात शिरत असल्याचे येथील परिसरातील नागरिकांनी सांगितले आहे.प्रसाद पाटील म्हणाले की, वऱ्हाळदेवी तलावातून नागरिकांना पिण्यासाठी पालिका दररोज दोन एमएलडी पाणी पुरवते.परंतु हा तलाव प्रशासकीय दुर्लक्षाचा बळी ठरला आहे.सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे या तलावाची दुरवस्था झाली आहे.या तलाव संकुलाला पालिका व पोलिसांच्या अभयामुळे बेवड्यांनी आपले अड्डे बनवले आहे.त्यामुळे येथे मद्यधुंद अवस्थेत हाणामारीच्या घटनांसह तलावात मृतदेहही तरंगताना दिसून आल्याच्या घटना घडल्या आहेत.तर या परिसरात कडक बंदोबस्त व गार्डनमध्ये दारू पिणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी महापालिका आयुक्त विजयकुमार म्हसाळ आणि डीसीपी नवनाथ ढवळे यांची भेट घेणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *