भिवंडी : भारतीय हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार आणि मागील वर्षी शहरामध्ये ठिकठिकाणी आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्याच्या पार्श्वभूमीवर भिवंडी शहरामध्ये अशी आपत्कालिन परिस्थिती उद्भवल्यास संबंधित सर्व प्रशासनाच्या जबाबदारीप्रमाणे कर्तव्य व त्यासंबंधीची तयारी,आखलेल्या करावयाच्या नियोजनबध्द उपाययोजना यासंदर्भात भिवंडीतील सर्व संबंधित प्रशासनांची भिवंडी महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली.याप्रसंगी प्रशासक तथा आयुक्त विजयकुमार म्हसाळ यांनी सांगितले की, भिवंडी शहरामध्ये हवामान खात्याच्या अंदाजानुसार समुद्राच्या पातळीमधील वाढ आणि मुसळधार पावसामुळे आपत्कालिन परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनातील अधिका-यांनी साहित्य, साधन सामुग्री व मनुष्य बळासह आपआपल्या क्षेत्रांमध्ये सज्ज रहावे. पूर्वीसारखे छत्रपती शिवाजी महाराज चौक, नदीनाका, नारळी तलाव शाळा, अजयनगर जकात नाका, काकूबाई चाळ, इदगाह रोड, आजमीनगर आदींसारख्या सखल, डोंगराळ व ऊंच भागातील दरडी कोसळणे व अशा ठिकाणी पाणी भरण्याच्या किंवा पुर परिस्थिती निर्माण झाल्यास आपत्कालिन पक्ष स्थापन केल्यास तातडीने पाण्याच्या पातळीविषयी, तेथील परिस्थितीविषयी तात्काळ माहिती मिळण्यास मदत होईल अशी सूचना करून तसा अहवालही मुख्य आपत्कालिन कक्ष व सबंधित अधिका-यांना दिला.अशा परिस्थितीत नागरीकांची जिवीत आणि वित्तहानी टाळण्यासाठी आपण संबंधितांनी सतर्क रहावे आणि अशा अप्रिय घटना घडणार नाही याची काळजी घ्यावी असेही त्यांनी सांगितले.तसेच वळपाडा येथील अतिधोकादायक इमारत पडल्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण भिवंडीतील प्रभागनिहाय सर्व्हेक्षणातून वर्गीकरण केलेल्या २६७ अतिधोकादायक इमारतींवर प्रथम प्राधान्याने कार्यवाही करून त्या महानगरपालिका, पोलिस प्रशासन, टोरंट पॉवर अशा विविध विभागांच्या योग्य त्या समन्वयातून संयुक्तपणे निष्काशनाची कारवाई करण्यात यावी. या कामामध्ये जातीने लक्ष देणे गरजेचे आहे असेही त्यांनी शेवटी सांगितले.सदर बैठकीमध्ये मनपाचे अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांनी यावेळी महानगरपालिकेच्यावतीने आपत्कालिन परिस्थितीत काम करणा-या सर्व विभागप्रमुखांना संपूर्ण तयारीनिशी सज्ज राहण्यास सांगितले आहे.पुढे ते म्हणाले की, शहरातील नागरीकांनी आपत्कालिन परिस्थितीत महानगरपालिकेच्या मुख्य आपत्कालिन कक्षांच्या (०२५२२-२५००४९, २३८७९७ या क्रमांकावर व १८००२३३११०२ या टोल फ्री क्रमांकावर आणि bncmc.dmo@gmail.com या ई-मेल वर संपर्क साधून आपत्कालिन परिस्थितीची किंवा मदतीसाठीची कल्पना द्यावी असेही नागरीकांना आवाहन केले.पोलिस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी परिस्थितीशी मुकाबला करण्यासाठी पोलिस प्रशासन सहकार्यासाठी तयार असल्याचे सांगितले.सदर तातडीच्या बैठकीस भिवंडी महानगरपालिकेचे उपायुक्त दिपक झिंजाड, उपायुक्त प्रणाली घोंगे, शहर अभियंता सुनील घोंगे, पोलिस सहाय्यक आयुक्त राजेंद्रकुमार डोंगरे,महापालिका सहाय्यक आयुक्त प्रीती गाडे, सर्व पोलिस स्टेशनचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक,संबंधित सर्व विभागप्रमुख, टोरंट पॉवरचे अधिकारी व विविध प्रशासनातील अधिकारी वर्ग उपस्थित होते.