अमेरिकेत पुन्हा गोळीबार; टेक्सास येथील शॉपिंग मॉलमध्ये अंदाधुंद गोळीबार, अनेक जण जखमी

विश्व



Texas Mall Shooting: अमेरिकेत पुन्हा एकदा गोळीबाराची घटना घडली आहे. टेक्सासमधील (Texas Mall Shooting) डॅलसजवळील एका शॉपिंग मॉलमध्ये एक बंदूकधाऱ्याने शॉपिंग मॉलमध्ये घुसून गोळीबार केला. अचानक झालेल्या गोळीबारामुळे मॉलमध्ये गोंधळ उडाला. माहिती मिळताच पोलीस पोहोचले आणि पोलिसांनी संपूर्ण मॉलला घेराव घातला.हल्लेखोर ठार झाल्याचे पोलिसांनी सांगितले. मात्र, हल्लेखोराने गोळीबार केल्यानंतर स्वत:वर गोळी झाडली की पोलिसांनी प्रत्युत्तरात (America News) केलेल्या कारवाईत त्याचा मृत्यू झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

टेक्सास येथे झालेल्या गोळीबारात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. टेक्सासच्या मॉलमध्ये झालेल्या गोळीबाराची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.

अमेरिकन मीडिया रिपोर्ट्सनुसार, रविवारी, 7 मे रोजी टेक्सास प्रांतातील डॅलसजवळील अॅलन शहरातील एका मॉलमध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळताच पोलिसांचे पथक पोहोचले आणि पोलिसांनी हल्लेखोराचा शोध सुरू केला. नंतर तेथे एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला, तो मृतदेह हल्लेखोराचा असल्याचे सांगण्यात आले. एका प्रत्यक्षदर्शी व्यक्तीने सांगितले की, त्याने मॉलमध्ये अचानक गोळीबाराचा आवाज ऐकला आणि अनेक लोक मॉलमधून बाहेर पळताना पाहिले.



अमेरिकेतील बंदूक संस्कृती मोठी समस्या

अमेरिकेसाठी बंदूक संस्कृती ही मोठी समस्या बनली आहे. 2021 मध्ये जवळपास 49 हजार लोकांनी गोळीबारात आपला जीव गमावला. त्यापैकी अर्ध्याहून अधिक लोकांनी आत्महत्या केली. देशात लोकसंख्येपेक्षा जास्त शस्त्रं आहेत. तीनपैकी एका प्रौढ व्यक्तीकडे किमान एक बंदूक असते आणि दोनपैकी जवळपास एक प्रौढ व्यक्ती बंदूक असलेल्या घरात राहतो.

गोळीबाराच्या घटना वाढत्या…

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका आणि गोळीबार हे समीकरण झालं आहे. गेल्या वर्षी म्हणजेच, 2022 मध्ये अमेरिकत गोळीबारात शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. गोळीबाराच्या या घटना हॉस्पिटल, पब, मेट्रो स्टेशन आणि इतर सार्वजनिक ठिकाणी घडल्या आहेत. अमेरिकेसाठी तेथील बंदूक संस्कृती ही दिवसागणिक मोठी समस्या होत चालली आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. देशात शस्त्रास्त्रांबाबत कठोर निर्णय घेण्याची गरज असल्याचं मत राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी स्वत: व्यक्त केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *