Nashik Crime : ऑनलाईन गेम खेळत असाल तर सावधान! तुमचं बँक खात रिकामं होऊ शकत…

महाराष्ट्र

Nashik Crime : सध्या प्रत्येकाच्या हातात मोबाईल (Mobile) आल्याने इंटरनेटसह अनेक सुविधा यात मिळत आहेत. मात्र अनेकजण मोबाईलच्या माध्यमातून ऑनलाईन गेमिंगच्या (Online Game) आहारी जात असल्याचे चित्र सभोवताली पाहायला मिळत आहे. यातून अनेकदा फसवणूक (Fraud) झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशातच नाशिक (Nashik) जिल्ह्यातील लासलगाव (Lasalgaon) येथील तरुणाला ऑनलाईन गेमिंग चांगलेच महागात पडले आहे.

दोनच दिवसांपूर्वी ऑनलाइन गेमच्या (Online Game) नादात एका युवकाची तब्बल 40 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना जालना (Jalna) तालुक्यातील ढगे गावात उघडकीस आली होती. या तरुणाला ऑनलाईन गेमिंग खेळण्यासाठी एक एकर शेतीसह 17 लाख रुपयांची कारही विकावी लागली. अशीच एक घटना नाशिक जिल्ह्यात समोर आली आहे. सदर तरुणाची ऑनलाइन बिंगो सायबर गेम खेळल्यास झटपट दुप्पट पैसा देण्याचे आमिष दाखवून छत्तीस लाख ऐंशी हजार रुपयांची फसवणूक केली. या प्रकरणी पाच जणांविरोधात लासलगाव पोलीस कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुभम सुनील शेळके यांनी दिलेल्या फिर्यादीत संशयित आचल चौरसिया, रमेश चौरसिया, कैलास शहा, गणेश एकनाथ दिडे , अमोल कपिल यांनी दिनांक 21 फेब्रुवारी 2022 ते दिनांक 14 ऑक्टोबर 2022 पर्यंत वेळोवेळी निफाड तालुक्यातील धारणगाव व अहमदनगर जिल्ह्यातील अकोले येथील संशयित गणेश दिडे याचे लॉटरीचे दुकानात वेळोवेळी ऑनलाइन बिंगो गेम खेळले. संशयितांनी सदर तरुणास सायबर गेम खेळल्यास झटपट दुप्पट पैसा मिळतात, असे विश्वासाने सांगून अधिक आर्थिक लाभाचे आमिष दाखवून शुभम यास ऑनलाइन बिंगो सायबर गेम मोबाइलमध्ये खेळण्यास भाग पडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

तेव्हा फसवणूक झाल्याचं कळलं..
दरम्यान संशयितांनी फिर्यादीस विश्वासात घेत पैशांचे आमिष दाखवून शुभमने वेळोवेळी गणेशला पैसे दिले. तसेच अमोल कपिले यांच्या सांगण्यावरून राहुल माणिक गोतरणे व संतोष मोहन चव्हाण यांच्या फोन पेवर ऑनलाइन बिंगो सायबर गेम खेळण्यासाठी वेळोवेळी पैसे ऑनलाइन ट्रान्स्फर केले. या कालावधीत फिर्यादी शुभम याने जवळपास 36 लाख 80 हजार रुपये संशयिताच्या बँक खात्यावर ऑनलाईन पद्धतीने पाठविले. मात्र या खेळात शुभम हरतच गेला. ऑनलाइन बिंगो सायबर गेममध्ये हरल्याने शुभमची आर्थिक फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऑनलाइन बिंगो सायबर गेम खेळण्यास भाग पाडणारे आणि चालविणाऱ्या संशयितांनी शुभम यास ऑनलाइन बिंगो सायबर गेम खेळण्यास प्रवृत्त करून अधिक पेशाचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक केली म्हणून लासलगाव पोलिसांत गुन्हा झाला आहे. अधिक तपास स्थानिक गुन्हा शाखा पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मुरडनर करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *