World Hemophilia Day 2023 : ‘जागतिक हिमोफिलिया दिन’ नेमका का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

विश्व

World Hemophilia Day 2023 : जागतिक हिमोफिलिया दिन दरवर्षी 17 एप्रिल रोजी जागतिक हिमोफिलिया महासंघाद्वारे साजरा केला जातो. हिमोफिलिया आणि इतर रक्तस्त्राव विकारांच्या गंभीर समस्येबद्दल जनजागृती करण्याचा हा दिवस आहे. हिमोफिलिया हा एक असा जीवघेणा आजार आहे, ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला दुखापत झाल्यानंतर त्याचे रक्त वाहणे थांबतच नाही. म्हणजेच अशा व्यक्तीला किरकोळ दुखापत होऊनही त्याचे रक्त थांबत नाही आणि अतिरक्तस्रावामुळे त्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. याच संबंधित या दिनाचा इतिहास आणि महत्त्व जाणून घेऊयात.

जागतिक हिमोफिलिया दिनाचा इतिहास

जागतिक हिमोफिलिया दिन दरवर्षी 17 एप्रिल रोजी जागतिक हिमोफिलिया महासंघातर्फे पाळला जातो. हिमोफिलिया आणि इतर रक्तस्त्राव विकारांबद्दल जनजागृती करण्याचा हा दिवस आहे. जागतिक हिमोफिलिया दिनाची सुरुवात 1989 मध्ये झाली आणि 17 एप्रिल हा दिवस हिमोफिलियाच्या जागतिक महासंघाचे संस्थापक फ्रँक श्नबेल यांच्या वाढदिवसानिमित्त पाळण्यात आला. रक्तस्त्राव विकार असलेल्या लोकांना शिक्षित करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. वर्ल्ड फेडरेशन जगभरातील लोकांना या विकाराने ग्रस्त असलेल्यांसाठी एकता दर्शविण्यासाठी हा दिवस पाळला जातो.

हिमोफिलिया हा एक दुर्मिळ विकार आहे ज्यामध्ये रक्त सामान्यपणे गोठत नाही कारण त्यात रक्त गोठणारे प्रथिने (क्लटिंग घटक) नसतात. एखाद्याला हिमोफिलिया असल्यास, दुखापतीनंतर त्यांना जास्त काळ रक्तस्त्राव होऊ शकतो कारण त्यांच्या शरीराची रक्त गोठण्याची क्षमता कमी होते.

जागतिक हिमोफिलिया दिनाचं महत्त्व

हिमोफिलिया आणि रक्ताशी संबंधित विकार असलेल्या लोकांमध्ये जनजागृती करणे हे या दिवसाचे महत्त्व आहे. गंभीर रुग्णांमध्ये स्नायू, सांधे आणि शरीराच्या इतर भागांमध्ये रक्तस्त्राव होऊ शकतो. हा एक अनुवांशिक आजार आहे, जो मुलाला त्याच्या पालकांकडून होतो. त्यामुळे लवकर निदान झाल्यास रुग्णाला या आजाराबाबत जागरूक राहण्यास आणि खबरदारी घेण्यास मदत होते.

हिमोफिलिया आजाराची लक्षणे?

जर एखाद्या व्यक्तीला हिमोफिलिया हा आजार झाला असेल, तर त्याला थोडासा ओरखडा आला तरी रक्त सतत वाहत राहते. अशा व्यक्तीच्या हाडांच्या सांध्यांमध्ये वेदना कायम राहतात. शरीराच्या कोणत्याही भागात अचानक सूज येते. त्यांना मल किंवा मूत्रात रक्तस्त्राव होतो. शरीरावर निळ्या खुणा येतात. नाकातून रक्त येणे, हिरड्यांमधून रक्त येणे, त्वचेवर सहज ओरखडे येणे अशी अनेक लक्षणे यात दिसतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *