भिवंडी (प्रतिनिधी )भिवंडी शहरातील शांतीनगर परिसरात गोळीबार करून एका इसमाच्या हत्येचा गुन्ह्यात चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस शांतीनगर पोलिसांनी उत्तर प्रदेश येथून ताब्यात घेत अटक केली आहे.सदर आरोपी हा उत्तर प्रदेश येथे गँगस्टर म्हणून कुप्रसिद्ध होता अशी माहिती शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांनी दिली आहे.वकिल उर्फ सानु अब्बास मन्सुरी असे अटक आरोपीचे नाव आहे.शांतीनगर परिसरात राहणारे सत्तार मंसुरी यांची जमिनीच्या वादातुन गुलजार नगर येथे उत्तरप्रदेश येथील आरोपींनी कट रचुन गोळ्या घालुन हत्या केली होती.याप्रकरणी दाखल गुन्ह्यात शांतीनगर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली होती.पण मुख्य आरोपी मन्सुरी हा गुन्हा झाल्या पासून चार वर्षे फरार होता.मिळालेल्या माहिती नुसार आरोपी सानु अब्बास मन्सुरी हा उत्तर प्रदेश राज्यातील फुलपुर जिल्हा प्रयागराज येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यामुळे भिवंडी पोलीस उपाआयुक्त डॉ.श्रीकांत परोपकारी,सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन सांगळे व शांतीनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर इंदलकर यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश चोपडे व पोलिस कर्मचारी श्रीकांत धायगुडे,रूपेश जाधव,प्रशांत बर्वे,पोलिस हवालदार संतोष मोरे,रिजवान सैय्यद,किरण मोहिते,दिपक सानप,मनोज मुके,यांचे पथक तपासासाठी उत्तरप्रदेश येथे रवाना झाले.फुलपुर, पोलीस ठाणे, प्रयागराज यांचे मदतीने पोलिस पथकाने फरार आरोपी वकिल उर्फ सानु अब्बास मन्सुरी याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेत अटक केली आहे. मन्सुरी हा गॅगस्टर आरोपी असुन त्याच्या विरोधात उत्तर प्रदेश येथील विविध पोलिस ठाण्यात खुन, खुनाचा प्रयत्न असे गंभीर स्वरूपाच्या सात गुन्ह्यांची नोंद आहे.अधिक तपास शांतीनगर पोलीस करीत आहेत.