भिवंडी : अनंत चतुर्दशी गणपती मूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी ईद-ए-मिलादुनबी या सणानिमित्ताने शहरात मिरवणूक निघणार असल्याने पोलिसांसमोर पेच निर्माण होता. मात्र शहरात ईद-ए-मिलादुनबी मिरवणूक शुक्रवारी निघणार असल्याची घोषणा रजा अकादमीचे भिवंडी अध्यक्ष शकील रजा यांनी केल्याने शहरात या दोन्ही सणांचा उत्साह वाढला असून पोलिसा समोरील पेच सुटला आहे.यावर्षी गणपती मूर्ती विसर्जनाची अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलादुनबी हे दोन्ही सण २८ सप्टेंबर गुरुवार रोजी आहेत. या दोन्ही मिरवणुकीचा काही मार्ग शहरातील एकाच चौकातून जात असल्याने या मिरवणुकीचे नियोजन कसे करावे, हा पेच पोलिसांसमोर होता.शहरातील दोन्ही धर्मियांचा समावेश असलेल्या शांतता व मोहल्ला कमिटीच्या आजवरच्या कार्याने जगात आपला ठसा उमटवला आहे. त्यामुळे चर्चेतून शांततापूर्वक मार्ग निघणार हा विश्वास पोलिसांना होता. याबाबत गेल्या काही दिवसांपासून दोन्ही धर्मीयांमध्ये चर्चा सुरु होत्या. या चर्चेतून आणि रजा अकादमीच्या वरिष्ठांच्या निर्णयानुसार शहरातील रजा अकादमीचे अध्यक्ष शकील रजा यांनी शुक्रवारी २९ सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादुनबीची मिरवणूक निघणार असल्याचे जाहीर केले.या घटनांचे सर्व समाज बांधवांनी स्वागत केले.यासाठी शहराचे पोलीस उपायुक्त नवनाथ ढवळे यांनी दोन्ही समाजातील सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी,धार्मिक धर्मगुरू यासोबत बैठक घेऊन यामधून सामंजस्याचा मार्ग काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यानंतर मुंबईतील खिलापत हाऊस येथे बैठकीचे आयोजन केले. त्यामधून घेतलेल्या निर्णयाने शहरात दोन्ही सणांचा उत्साह वाढला आहे. या निर्णयाने दोन्ही सण आनंदात साजरा करण्यात येणार असून गुरुवारी २८ तारखेस अनंत चतुर्दशीचे गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक निघणार आहे तर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी २९ तारखेस ईद-ए-मिलादुनबी मिरवणूक निघणार आहे.या निर्णयामुळे भिवंडी शहरातील राष्ट्रीय एकात्मता व सर्वधर्म समभाव या भावना वृद्धिंगत होतील,अशी प्रतिक्रिया शकील राजा यांनी माहिती देताना दिली.
