बांगलादेशातून छुप्या मार्गाने येवून भिवंडी शहरात बेकायदेशीरपणे राहणाऱ्या तीन बांगलादेशी तरुणांना नारपोली पोलिसांनी भिवंडी शहरातील दापोडा येथील इंडियन कंपाउंड गेटजवळ सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.सोहेल इमाम शेख (२०),असीफ समसूद शेख (२१) ,तरीकूल अबूतालेब मंडल (४२) अशी गजाआड करण्यात आलेल्या बांगलादेशी तरूणांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,हे तिघेही बांगलादेशी तरुण गेली अनेक वर्षांपासून भिवंडीतील कोनगाव येथील माऊली अपार्टमेंटमधील धर्मनिवासात राहत असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.नारपोली पोलिसांना या बांगलादेशी तरुणांची गुप्त माहितीदाराकडून माहिती मिळताच,१७ मे रोजी रात्री मानकोली येथील इंडियन कंपाउंडच्या गेटजवळील पानटपरी लगत सापळा रचून त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे चौकशी केली असता, अनेक वर्षांपासून भिवंडीत राहत असल्याचे समोर आले. त्यानंतर या बांगलादेशी तरुणांच्या विरोधात पोलीस नाईक सुनिल दिलीप शिंदे यांच्या तक्रारीवरून नारपोली पोलीस ठाण्यात विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे.अटक केलेल्या तीन बांगलादेशी तरुणांकडे भारताचा अधिकृत पारपत्र किंवा भारत देश किंवा बांगलादेशाचा विजा नसताना पैसे कमावण्याच्या उद्देशाने छुप्या मार्गाने दलालाच्या मदतीने बांगलादेशातून भिवंडीत येवून अनधिकृतपणे वास्तव्यास राहत असल्याची प्रथम दर्शनी तपासात आढळून आले आहे.शिवाय अटक बांगलादेशी तरुणांकडे आधारकार्ड, पॅन कार्ड बनावट असल्याचे उघडकीस आले आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रोहन शेलार करीत आहेत.
