मागील जवळपास साडे-तीन वर्षांपासून जगभरात हाहा:कार माजवणाऱ्या कोरोनाची लाट संपली असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) केली आहे. कोविड 19 आता जागतिक आरोग्य आणीबाणी (Global Health Emergency) हटवण्यात आली असल्याची घोषणा जागतिक आरोग्य संघटनेने केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या याबाबतच्या आपात्कालीन परिस्थितीबाबतच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला.
जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव डॉ. टेड्रोस यांनी म्हटले की, काल आपत्कालीन समितीची 15 वी बैठक झाली. यामध्ये, कोविड-19 ला जागतिक आरोग्य आणीबाणीच्या कक्षेबाहेर घोषित करावे, अशी शिफारस करण्यात आली. ही शिफारस आपण स्वीकारत असल्याचे डॉ. टेड्रोस यांनी म्हटले.
जागतिक आरोग्य आणीबाणी केव्हा जाहीर झाली?
WHO ने सांगितले की 30 जानेवारी 2020 रोजी कोविडला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली. जागतिक आरोग्य आणीबाणी मागे घेतली असली तरी कोरोना अजूनही जागतिक आरोग्यासाठी धोका आहे, असे WHO ने स्पष्ट केले.
कोरोनाला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली तेव्हा चीनमध्ये 100 पेक्षा कमी कोरोना रुग्ण आढळले होते. त्यावेळी एकही मृत्यू झाला नव्हता. मात्र तीन वर्षांनंतर हा आकडा वाढून 70 लाखांपर्यंत पोहोचला. सुमारे 20 लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले.
जागतिक आरोग्य आणीबाणी का हटवली?
डब्ल्यूएचओने सांगितले की, गेल्या वर्षभरात कोविडच्या प्रकरणांमध्ये झालेली घट लक्षात घेऊन सार्वजनिक जागतिक आरोग्य आणीबाणीतून कोरोना काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाचा इतका मोठा परिणाम झाला की शाळा ते कार्यालय बंद राहिले. या काळात बरेच लोक तणाव आणि चिंतेतून गेले. त्यातून जागतिक अर्थव्यवस्था उद्ध्वस्त झाली असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले.
डॉ. टेड्रोस यांनी काय म्हटले?
जागतिक आरोग्य संघटनेचे महासचिव डॉ. टेड्रोस यांनी म्हटले की, जागतिक आरोग्य आणीबाणी हटवली असली तरी कोरोनाचा धोका पूर्णपणे संपला नाही. मागील आठवड्यात दर तीन मिनिटाला कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू होत होता. कोरोनाचे नवीन व्हेरिएंट येत असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले.